दापोलीत हिंदू जनजागृती समितीमार्फत ‘लव्ह जिहाद’ विरोधी जनजागृती मोर्चा

दापोली : दापोली शहरात आज रविवार 7 डिसेंबर रोजी हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली विराट आणि भव्य अशा ‘लव्ह जिहाद’ विरोधी जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू भगिनी व मुलींच्या सुरक्षेच्या मागणीसाठी तसेच कथित ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

या मोर्चादरम्यान उपस्थितांनी घोषणाबाजी करत सरकारकडे कठोर कायद्याची मागणी केली. मोर्चाच्या समारोपस्थळी समितीच्या वतीने सरकारला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा राज्यात तातडीने लागू करण्याची जोरदार मागणी व्यक्त करण्यात आली. धर्मांतराच्या उद्देशाने खोटी ओळख सांगून करण्यात येणाऱ्या विवाहप्रकरणांवर कठोर कारवाईची गरज असल्याचेही यात नमूद करण्यात आले.

निवेदनात उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतरण बंदी’ संबंधित कठोर कायदा लागू करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या प्रकरणांची नोंद घेण्यासाठी व तपास करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर ‘प्रत्यागृती कक्ष’ (Recantation Cell) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. अशा कक्षांमार्फत पीडित महिलांना कायदेशीर, मानसिक आणि सामाजिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती समितीने सरकारला केली.

याशिवाय अशा घटनांमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कठोर शिक्षा आणि दंडात्मक कारवाईची व्यवस्थाही करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका समितीने घेतली. ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती, संघटना किंवा गटांवर कायद्याची कठोर अंमलबजावणी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच शिक्षण, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात व्यापक जनजागृती मोहिम राबवावी, अशी मागणीही या मोर्चातून करण्यात आली. या निवेदनात ‘लव्ह जिहाद’ ही सामाजिक समस्या नसून हिंदू मुलींना लक्ष्य करून फसवणूक, अत्याचार, धर्मांतरण आणि आर्थिक लूट करण्याचा एक संघटित गुन्हेगारी प्रकार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या बेपत्ता महिलांच्या आकडेवारीचा संदर्भ देत समितीने या प्रश्नाची गंभीरता मांडली.

हिंदू जनजागृती समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, राज्य व केंद्र सरकारांनी त्वरित आणि कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर ‘राष्ट्र सुरक्षित, तरच स्त्री सुरक्षित’ या ध्येयाने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. दापोलीतील या मोर्चामुळे स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली असून, या कायद्याविषयी सरकार कोणती दिशा घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 08/Dec/2025