रत्नागिरी : विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाला सुरुवात झाली. खेड, सावर्डेसह रत्नागिरी तालुक्यात जोरदार पाऊस पडला. किनारपट्टी परिसरात वेगवान वारेही वाहत होते. या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. या पावसाचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला असून अनेक ठिकाणी उभी रोपं आडवी झाली आहेत. कापणीयोग्य भात रोपांसाठी सध्या पडत असलेला पाऊस त्रासदायक ठरू शकतो.
मागील आठवड्यात जिल्ह्यात पावसाने पूर्णतः उसंत घेतलेली होती. दिवसभर कडकडीत उन पडलेले होते, काल रात्री अचानक रत्नागिरीत वेगवान वाऱ्यासह जोरदार सरी पडल्या. रात्री ८ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस पुढे अर्धा तास सुरू होता. रात्री पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पंचाईत झाली होती. अनेकांनी दुचाकी थांबवून मिळेल तिथे आसरा घेतलेला होता. पाऊस थांबल्यानंतर सर्वजण रवाना झाले. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल अशी शक्यता होती. हवेतही प्रचंड उष्मा जाणवत होता. खेड शहरासह ग्रामीण भागात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे खेड शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले होते. वेगवान वाऱ्यामुळे दुपारी वीजपुरवठा खंडीत झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत खेड परिसरात जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणारे आणि बाजारात आलेल्या ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती. सुमारे दोन तास पाऊस कोसळला. त्यामुळे खेड शहरातील काही भागात पाणी साचून राहिल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 24-09-2024