कोल्हापूरवर महापुराची टांगती तलवार..!

Jul 25, 2024 - 11:53
Jul 25, 2024 - 12:00
 0
कोल्हापूरवर महापुराची टांगती तलवार..!

◼️ राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला, २९२८ क्यूसेकने विसर्ग सुरु; कोल्हापुरातील पूरपरिस्थिती गंभीर होणार?

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर (Kolhapur Flood) पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार आहे.

पंचगंगा नदीने (Panchganga River) धोका पातळी गाठल्याने कोल्हापूरकर पुन्हा एकदा धास्तावले आहेत.

पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट 1 इंचांवर गेली आहे. त्यामुळे आता जितकी पाण्याची पातळी वाढत जाईल तितकं पाणी कोल्हापूर शहराच्या आणि महामार्गावर सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. पुरग्रस्त भागातून स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांची पुरसदृश्य स्थिती असल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यांयी मार्गांनी वाहतूक सुरु आहे.

राधागनगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून १४२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून, विज निर्मिती केंद्रातून १५०० क्युसेस विसर्ग असा एकूण २९२८ क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. ३४७.५ फूट पाणी पातळी झाली आहे. गेले सात आठ दिवस पाटबंधारे विभागाकडून वीज निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग चालू केला होता. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले. किंबहुना राधानगरी धरणाचे दरवाजे मागील आठवड्यात उघडले असते तर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असती. आज दिवसभर पावसाचा जोर अधिक राहिल्यास आज सायंकाळपर्यंत आणखी स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर पाणी येण्याची शक्यता?

कोल्हापूरकरांच्या 2019 आणि 2021 मधील आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीकडे गेल्याने पुणे बंगळूर महामार्गावर पाणी येणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. शिरोलीत पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला (pune bangalore national highway) लागून असलेल्या शिये-कसबा बावडा मार्गावर पाणी आल्यानं सद्यस्थितीत वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीपात्रातील अतिक्रमणामुळे यावर्षी तब्बल पाच फूट पाणी लवकर आलं आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदी 43 फूट 1 इंचावर असून साधारण 47 फुटांवर गेल्यास राष्ट्रीय महामार्गावर पाणी येऊन महामार्ग बंद होऊ शकतो.

विशेष म्हणजे 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदी 45 फुटांवर गेल्यानंतर शिये बावडा रस्त्यावर पाणी आल्याची परिस्थिती होती. यंदा मात्र 41 फुटांवर पाणी आल्यानंतर शिये बावडा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या मार्गावर तीन फुटांवर पाणी आलं आहे. मागील पुराच्या तुलनेत पाच फूट कमी पाणी कमी असतानाही सेवा मार्गावर पाणी आल्याने यावेळी कदाचित पंचगंगा नदी 47 फुटांच्या आसपास गेल्यास महामार्गावर पुराचे पाणी येण्याची टांगती तलवार आहे.

धरणांमधून विसर्ग वाढला

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत असली, तरी आज (25 जुलै) राधानगरी 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 ते 72 तासात धरणाचे पाणी पंचगंगेला पोहोचल्यास तसेच पावसाचा जोर राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.

पंचगंगा नदी किती फुटांवर आल्यानंतर कोणत्या भागात पाणी?

  • 43 फूट- सुतारवाडा
  • 45 फूट- जुने शिये नाका ओढ्यावर पाणी येवून बावडा रस्ता बंद
  • 45 फूट- रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा बटाटा मार्केट शाहूपुरी कोंडा ओळ
  • 46 फूट 5 इंच- व्हिनस कॉर्नर, व्हिनस टॉकीज ते बर्फ फॅक्टरी रस्ता बंद, नाईक मळा, पोलो ग्राऊंड
  • 47 फूट 2 इंच- पंचगंगा हॉस्पिटल, जामदार क्लब, शुक्रवार पेठ पश्चिम बाजू
  • 47 फूट 2 इंच- आयडियल कॉलनी लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा व शिंगणापूर रस्ता बंद
  • 47 फूट 4 इंच- शाहूपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा, यशोधा पार्क, मलयगिरी अपार्टमेंट, जाधववाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत येथे पाणी येते.
  • 47 फूट 5 इंच- रेणुका मंदिर गुंजन हॉटेल, त्रिंबाली नगर, रेणुका नगर, घाडगे गृहयोग व रेणुका मंदिर पिछाडीस पाणी येते. माळी मळा, मेडिकल कॉलेज बावडा, उलपे मळा, रमण मळा, जावडेकर इमारत, नाईक मळा, पॅलेस पिछाडीस, राजहंस प्रिंटिंग प्रेस, हरिपूजा पुरम
    * त्रिकाणी बाग ते महावीर कॉलेज रस्ता बंद
    * केव्हिज पार्क, दीप्ती पार्क, डायमंड हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल
    * खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद
    * जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज वाया पाटलाचा वाडा रस्ता बंद
    * बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद
    * भालजी पेंढारकर हॉल परिसर (महावीर गार्डन दक्षिण बाजू)
    * दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद
    *दुर्गा मंदिर (लक्षतीर्थ वसाहत )
  • 47 फूट 5 इंच- विलसर पूल ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद
    * लक्ष्मीपुरी ते नाईक अँड नाईक कंपनी रस्ता बंद
    *गवत मंडई रस्त्याची पश्चिम बाजू पाण्यात
  • 47 फूट 7 इंच- सुभाष रोड (टायटन शोरुम ते फोर्ड कॉर्नर) रस्ता बंद
  • 47 फूट 8 इंच- पिनाक, सनसिटी, माळी मळा, महावीर कॉलेज पिछाडिस, पोलो ग्राऊंड, जावडेकर अपार्टमेंट, ड्रिम वर्डची मागील बाजूस
  • 48 फूट - मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते मलयगिरी रस्ता बंद
    * काटे मळा ते सफायर पार्क रस्ता बंद
    * मेनन बंगला ते शेळकेसो नगरसेवक घरासमोरील रस्ता बंद
  • 48 फूट 8 इंच- शंकराचार्य मठ, पंचगंगा तालीम (जामदार क्लब ते पंचगंगा हॉस्पिटल रस्त्याची पश्चिम बाजू पूर्ण पाण्यात )
    * उषा टॉकिज (बी न्युज ऑफिस ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद (स्टेशन रोड)
  • 49 फूट 11 इंच- घोडकेवाडी, मुक्त सैनिक वसाहत पूर्व बाजू, एमएसईबी, बापट कॅम्प, कदमवाडी, गणेश पार्क
  • 51 फूट - दुधाळी (कोल्हापूर ऑर्थोपेडीक सेंटर, महाराणा प्रताप हायस्कूल) उत्तरेश्वर गवत मंडई नाका, दुधाळी ग्राऊंड परिसर
  • 51 फूट 8 इंच- कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्ता बंद
  • 53 फूट - बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग पाण्यात (जिल्हाधिकारी कार्यालय पिछाडीस उमेदपुरी)
  • 55 फूट 7 इंच- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंदाजे 3 ते 4 फुट पाणी होते व जिल्हाधिकारी कार्यालय समोरील भाग (नागाळा पार्क) पुराचे पाणी आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow