'चिपळूण बंद'ला शंभर टक्के प्रतिसाद: उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा; आरोपीला तातडीने शिक्षा देण्याची मागणी

Aug 3, 2024 - 11:19
Aug 3, 2024 - 11:22
 0
'चिपळूण बंद'ला शंभर टक्के प्रतिसाद: उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा; आरोपीला तातडीने शिक्षा देण्याची मागणी

चिपळूण : उरण येथील यशश्री शिंदे हिची हत्या करणा-यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी चिपळूणात गुरुवारी आयोजित निषेध मोर्चाद्वारे एका विकृत विचारांच्या महिलेने धार्मिक भावना दुखावणारी व तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच अशी घटना होऊ नयेत यासाठी शासनाने देखील कायदा करावा व शिंदे हिच्या मारेकरी फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशा एकूणच मागणीसाठी शुक्रवारी (दि. २) चिपळूणातील व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. यावेळी सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या मोर्चात हजारोजण सहभागी झाले होते.

गुरुवारी पिपळुणातील न. प. समोरील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलानजिक शहरातील सनातन संस्था हिंदुत्वनिष्ठ संघटना, अन्य जाती-धर्मातील नागरिकांकडून उरण येथील तरुणीच्या हत्येप्रकरणी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी खेडेकर संकुल परिसरात सहभागींकडून निषेधाच्या घोषणा देण्याचे काम सुरू होते. दरम्यान, एक महिला त्या ठिकाणी अचानक आली व तिने जाती-धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करीत अर्वाच्य भाषेत हातवारे करून गोंधळ घातला. परिणामी, या ठिकाणी काही काळ वातावरण चिघळले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्या महिलेस ताब्यात घेतले. यानंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. व्यापारी महासंघाने या संदर्भात चिपळूण बंदचे आवाहन करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी बैठक घेतली. या बैठकीत सर्व वर्गातील व्यापारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाचे मत जाणून घेण्यात आले. त्यानंतर व्यापारी महासंघाच्या वतीने अत्यावश्यक व शैक्षणिक सेवा वगळता सर्व व्यवहार, व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. 

त्याला व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनानंतर पहिल्यांदाच चिपळूण बाजारपेठेत व्यवहार ठप्प झाले होते. परिणामी दररोजची सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाली. तसेच व्यापारी महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दोषींवर कारवाई करा अशा मागणीचे फलक घेत व घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयाकडे नेण्यात आला. तेथे गेल्यावर व्यापारी महासंघटनेच्या वतीने किशोर रेडीज व उदय ओतारी यांनी, चिपळूणसारख्या शांत व सुसंस्कृत शहरात एखादी विकृत मनोवृत्तीची महिला येऊन जातीय तेढ निर्माण करणारे व अश्लील वक्तव्य करते हे चिपळूणच्या संस्कृतीला गालबोट लावण्यासारखे आहे. अशा प्रवृत्ती व वारंवार घटना घडू नयेत यासाठी वेळीच कारवाई करण्यासाठी आज महासंघटनेने बंदचे आवाहन केले. 

याला सर्व जाती-धर्मातील व्यापाऱ्यांसह सर्वांनीच प्रतिसाद दिला. यापुढे चिपळूणची संस्कृती जपण्यासाठी असाच प्रतिसाद द्यावा. तसेच गुरुवारच्या घटनेतील दोषी महिलेवर कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे उरण येथे घडलेल्या घटनेतील दोषीवर शासनाने फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून कारवाई करावी. तसेच शिळ फाटा येथील मंदिरात बसलेल्या महिलेवर अत्याचार करणाऱ्यांवर देखील शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर महासंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समितीने प्रांताधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी समितीमधील सदस्यांनी सांगितले की, चिपळुणात एका महिलेकडून जे जातीय तेढ निर्माण करणारे व अश्लील वक्तव्य करण्यात आले त्यामागे कोणतीतरी अज्ञात शक्ती आहे. त्यामुळे शहरात भीती व वातावरण निर्माण झाले आहे. अशा अज्ञात विकृत शक्तींचा शोध प्रशासनाने गांभीयनि घ्यावा व संबंधितासह त्या महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पावणेचार हजार व्यापाऱ्यांचे व्यवहार बंद
कोरोना महामारीनंतर चिपळूण बाजारपेठ प्रथमच उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती. यावेळी शहर परिसरातील व्यापारी महासंघटनेतील सुमारे पावणेचार हजार व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार आणि व्यवसाय बंद ठेवले. तसेच शहरातील अन्य व्यावसायिकांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्वप्रकारच्या संघटना, फेरीवाले, भाजी विक्रेते आदींनी देखील या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली होती. ग्रामीण भागातून येणारे ग्राहक देखील बाजारपेठेत न फिरकल्याने त्याचा एसटी वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow