'...तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल', रणदीप सुरजेवालांवर जगदीप धनखड यांचा संताप

Aug 5, 2024 - 15:43
Aug 5, 2024 - 16:23
 0
'...तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल', रणदीप सुरजेवालांवर जगदीप धनखड यांचा संताप

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन कुठल्या ना कुठल्या कारणाने वादळी ठरत आहे. आजही(दि.5) राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आणि काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्यात वाद झाला.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) एका प्रश्नाला उत्तर देत होते, तेव्हा सुरजेवालांनी हात वर करुन एक कागद दाखवला, ज्यामुळे धनखड त्यांच्यावर चिडले.

सविस्तर माहिती अशी की, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यसभेत बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा काँग्रेसचेराज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी एक कागद दाखवला. त्यावर सभापती जगदीप धनखर त्यांच्यावर संतापले. "सुरजेवाला, तुम्ही हा पेपर का दाखवता? तुम्ही मला त्यांचे नाव देण्याची सक्ती का करत आहात? यापुढे पेपर दाखवला, तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, सुरजेवाला यांनी कृषिमंत्र्यांनी उत्तरात आपले नाव घेतल्याचा दाखला देत, हा पेपर सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची परवानगी मागितली. यावर सभापती म्हणाले की, "तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताचे ऐकायचे नाही का? तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाने तुम्हाला रिफ्रेशर कोर्स उपलब्ध करून द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही आधी संसदेचे नियम पुस्तक वाचा," असा टोलाही धनखड यांनी लगावला.

शिवराज सिंह चौहान यांच्या भाषणादरम्यान विरोधी सदस्यांनी गदारोळ करत सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या संदर्भात चर्चा होत असताना, त्या चर्चेत गांभीर्याने सहभागी होणे, हे प्रत्येक सदस्याचे मूलभूत कर्तव्य आहे. चर्चेत विघ्न निर्माण होणे, ही त्या जागेची अवहेलना आहे. सुरजेवाला यांनी चर्चेला सुरुवात केली आणि मंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय निर्माण केला, याचे मी खंडन करतो."

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:26 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow