कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, गुणात्मक हुशारी विकासासाठी सार्थकी लावूया : खासदार नारायण राणे

Aug 9, 2024 - 16:01
Aug 9, 2024 - 16:14
 0
कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, गुणात्मक हुशारी विकासासाठी सार्थकी लावूया :  खासदार  नारायण राणे

कणकवली: सिंधुदुर्गातील बेकारी दूर करण्याचा माझा संकल्प आहे. सिंगापूर प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे पर्यटनावर आधारित प्रकल्प इथे आणायचे आहेत. त्यासाठी सहकार्य करा. कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, गुणात्मकता हुशारी येथील विकासासाठी सार्थकी लावूया असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले. 

कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभिकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर.के.हेगडे, राव, कांबळे, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, माजी आमदार राजन तेली, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभीकरण हे सर्वांच्या सहकार्यातून घडलेल्या विकासाचे प्रतीक आहे. त्यामुळे यापुढे नकारात्मकता मनातून काढून टाका. सहकार्याची भावना ठेवा. नुसते डोळे असून चालत नाही तर डोळसपणा हवा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तो दाखवला. तसेच हे रेल्वे स्थानक सुशिभिकरणाचे सुंदर काम उभे केले.

केंद्र सरकारने आणि राज्यातल्या महायुती सरकारने पायाभूत सुविधांमध्ये अशा प्रकारची फार मोठी सुधारणा केली आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी,त्यांनी समृध्द व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोकणी माणसाचे आतापर्यंत शोषण झाले होते. मात्र आता त्यांच्या घरात सुख आणि समाधान निर्माण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एकमेकांच्या हातात हात असणे हे सलोख्याचे प्रतीक आहे. कोकणी माणसाने तसेच सर्व जाती, धर्मातील लोकांनी रेल्वेस्थानकावरील या हातात हात घातलेल्या शिल्पाचे अनुकरण करावे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा कल्याणकारी आणि आर्थिकदृष्टया समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आपणही जोड दिली पाहिजे. तुम्ही दिलेल्या मतांची ताकद एवढी आहे की मला कोणी काहीही नाही म्हणत नाही. महाराष्ट्र सरकारने रेल्वे संदर्भातील कोणतेही पत्र अथवा परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे दिल्यास तो मागे येणार नाही. त्यामुळे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील सोयीसुविधांसाठी, त्या ठिकाणी काम करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी आपण राज्य सरकारचा प्रस्ताव आल्यावर संबंधित मंत्र्यांशी बोलून ती परवानगी मिळवून देऊ.

देशाच्या तिजोरीत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेले शहर ३४ टक्के हिस्सा उचलते. याचा विचार मुंबई लगत असणाऱ्या कोकणी माणसांनी केला पाहिजे. कोकण हे समृद्ध बनले पाहिजे. विरोधामुळे विकास होत नाही. हा विरोध थांबवा. इतर पक्षांची दुकाने आता बंद होत चालली आहेत.त्यामुळे प्रगतीसाठी भाजपचा विचार आचरणात आणा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. निलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow