'27 राज्यांत फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही'; लोकसभा निकालाआधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Jun 3, 2024 - 12:51
Jun 3, 2024 - 12:53
 0
'27 राज्यांत फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही'; लोकसभा निकालाआधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली : अवघ्या काही तासांत लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल लागणार आहे. त्याआधी देशात एकूण सात टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाची ही प्रक्रिया 1 जून रोजी संपली.

आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान, याच निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने निवडणुकीची (Election Commission Of India) संपूर्ण माहिती दिली.

64.2 कोटी लोकांनी मतदान केलं

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत मतदान प्रक्रियेची माहिती दिली. हा एक चमत्कार आहे. जे झालं तो चमत्कार आहे. आपल्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जगभरात आपण एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केलं आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदान केले, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

27 राज्यांत फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही

भारतात मतदान केलेल्यांची संख्या सर्व G7 देशांच्या मतदारांच्या पाच पट संख्या आहे. आम्ही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली होती. पण अनेकांना स्वतः मतदान केंद्रावर यायचं होतं. कारण त्यांना उत्साहाने सहभागी व्हायचं होतं. 27 राज्यांत फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडावी यासाठी आमच्यासोबत सर्व ब्रँड, सर्व पेट्रोल पंप, अनेक स्टार्ट अप्सने काम केलं. या सगळ्यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं. या सर्वांनी निवडणूक आयोगासोबत सोबत काम केलं. या सर्वांचे आम्ही आभार मानतो, अशा भावना राजीव कुमार यांनी व्यक्त केल्या.

मध्ये मध्ये हेलिकॉप्टर चेक करा असा मेसेज दिला जायचा. प्रत्येकाचे हेलिकॉप्टर चेक केले गेले. देशात असा कोणीही उरलेला नाही ज्यांचं हेलिकॉप्टर चेक झालं नाही. मुद्दाम संकेत देण्यासाठी हेलिकॉप्टर चेक केले गेले, असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 03-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow