रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरतीनंतरही १,११९ पदे रिक्तच

Aug 20, 2024 - 17:04
 0
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरतीनंतरही १,११९ पदे रिक्तच

रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे १ हजार ४०० पदे भरण्यात आली आहेत. तरीही जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ११९ पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवूनही अद्याप रिक्त पदांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघालेला नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची ओढाताण हाेत असून, विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान हाेत आहे.

मागील सुमारे १० वर्षांत शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यातच सेवानिवृत्त होणारे शिक्षक, आंतर जिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे. चालू शैक्षणिक वर्षात ३५० शिक्षकांची आंतर जिल्हा बदली झालेली आहे. दरवर्षी रिक्त पदांचा आलेख वाढत चालला असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही पालकांकडून सातत्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दाेन हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असतानाही ती पूर्ण भरण्यात आलेली नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच भरतीनंतरही रिक्त असलेली पदे कधी भरणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, ही पदे वेळीच न भरल्याने त्याचा परिणाम विद्यार्थी संख्येवरही होत आहे.

स्थानिकांचे बेमुदत उपोषण

शिक्षक भरतीमध्ये प्रत्येक वेळा स्थानिक डी. एड. धारकांना डावलण्यात आले आहे. स्थानिक बेरोजगार डी. एड. धारकांची केवळ तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येते. मात्र, कायम भरतीनंतर त्यांना कमी करण्यात येते. त्यासाठी मानधनावर काम करणारे तात्पुरते भरती करण्यात आलेले शिक्षक १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

शिक्षण हक्क कायदा धाब्यावर

शासनाच्या निकषाप्रमाणे १० टक्के पदे रिक्त असल्यास आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये. असे असतानाही शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने आंतर जिल्हा बदली झालेल्या ३५० पैकी १५० शिक्षकांना कार्यमुक्त केले. त्यामुळे रिक्त पदांमध्ये वाढ झाल्याने त्यांची संख्या १२ टक्क्यांपर्यंत गेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून शिक्षक हक्क कायदा धाब्यावर बसविण्याचे काम सुरू आहे.

आणखी २०० शिक्षक स्वगृही जाणार

गतवर्षी शिक्षकांची १५ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त असताना आंतर जिल्हा बदली झालेल्या ७०० शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे रिक्त पदांचा आलेख २५ टक्क्यांपर्यंत गेला होता. आंतर जिल्हा बदली झालेले आणखी २०० शिक्षक स्वगृही जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदांचा आकडा आणखी वाढणार आहे.

टीईटीबाबत संशयाचे वातावरण

टीईटी परीक्षेमध्ये अन्य जिल्ह्यातील उमेदवारांचा वरचष्मा राहिलेला आहे. मात्र, बोर्डाच्या परीक्षेमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे अव्वल राहिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा डंका राज्यभरात वाजत आहे. असे असतानाही टीईटी परीक्षेत अन्य जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण होतात. तसेच टीईटी परीक्षेत घोटाळाही पुढे आला होता. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या निकालाबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील डी. एड. उमेदवारांमध्ये संशयाचे वातावरण आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow