गुहागर : ग्रामीण भागातील बंद एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी

Aug 26, 2024 - 14:27
 0
गुहागर : ग्रामीण भागातील बंद एसटीच्या  फेऱ्या सुरू करण्याची मागणी

गुहागर : गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे तसेच खराब बाजूपट्टी, रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे अनेक एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. खराब झालेल्या या ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी श्रमदानाने केली असून या बंद करण्यात आलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने गुहागर एसटी आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, खराब साईटपट्टी व रस्त्यामुळे राज्य परिवहनच्या वाहनास अडथळा निर्माण होणाऱ्या रस्त्यांची यादी विभाग नियंत्रक, रत्नागिरी यांना गुहागर आगाराच्यावतीने पाठवण्यात आली होती त्यानंतर मदर मार्गावर एसटी फेरी बंद करण्यात आली होती. बंद एसटी फेरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच प्रवाशांचे हाल होत आहेत.

विद्यार्थी व नागरिक यांनी यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात तक्रार केल्यानंतर मनसेच्यावतीने गुहागर आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून सदरच्या फेऱ्या सुरू करण्यास याव्या अशी विनंती केली, त्यानंतर अनेक फेऱ्या सुरु करण्यात आल्या असून अत्यंत खराब असलेल्या रस्त्यांवरती एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. हे रस्ते सुस्थितीत झाल्यानंतर एसटी फेरी सुरू करण्यात येतील, असा विश्वास सोनाली कांबळे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, सुनील हळदणकर, सुजित गांधी, पत्रकार गणेश किरवे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow