तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमा, नवीन भव्य पुतळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

Aug 29, 2024 - 12:10
 0
तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमा, नवीन भव्य पुतळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

मुंबई : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.

छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow