लांजा : बेनीखुर्दमध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण

Aug 31, 2024 - 11:31
Aug 31, 2024 - 12:35
 0
लांजा : बेनीखुर्दमध्ये नागरिकांची पाण्यासाठी  वणवण

लांजा : ऐन पावसाळ्यात उशाला धरण आणि घशाला कोरड अशी परिस्थिती लांजा तालुक्यातील बेनिखुर्द बौद्धवाडी येथील नागरिकांची झाली आहे. गेली महिनाभर पंधरा ते वीस कुटुंबांना भर पावसात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी पुरवठ्याची मंत्रणा बंद पडून महिनाभराचा कालावधी होत आला तरी अद्यापही ग्रामपंचायत नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे.

तालुक्यातील बेनिखुर्द-खेरवसे या ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत नळपाणी योजना राबवली गेली आहे. मात्र, बौद्धवाडीला पाणी पुरवठा करणारी पाण्याची मोटरच बंद पडल्याने गेले महिनाभर येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. एक महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायत नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरले आहे. वस्तीपासून दूरवर असणाऱ्या एका विहिरीवरून येथील महिला पाण्यासाठी पायपीट करत आहेत. 

ग्रामपंचायतीला अनेकवेळा प्रत्यक्ष भेटून पाणी प्रश्न सोडवा, अशी मागणी करण्यात आले. मात्र, आज होईल उद्या होईल अशी आश्वासने देण्यात आली. एक महिना कालावधी झाला तरी अद्यापही नागरिकांना ग्रामपंचायतीचे पाणी मिळत नाही.

ग्रामपंचायतस्तरावर ग्रामीण पाणी पुरवठा कमिटी निवडण्यात आली आहे. मात्र त्यांनीही पाणी समस्येची दखल अद्यापही घेतली नाही. पाण्यासाठी विशेष करून महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दुरुस्ती केलेली मोटर पुन्हा जळली
मुंबई तर कधी पुणे येथे दुरुस्त करायला दिलेली मोटर दुरुस्त करून रविवारी आणण्यात आली. मात्र, त्याच दिवशी मोटर पुन्हा जळली असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी पुन्हा वणवण सुरू झाली आहे. ग्रामस्थ वर्षाला १८०० रुपये पाणीपट्टी भरत आहेत. मात्र एक महिना पाणीच न मिळाल्याने एका महिन्याची पाणीपट्टी माफ करा, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी पाण्याची मोटार बंद पडली. मोटरचा पार्ट लांजा व रत्नागिरी येथे मिळत नसल्याने पुणे येथून मागणी केली होती. नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे - योगेश लाखन ग्रामसेवक, बेनीखुर्द

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow