नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल : देवेंद्र फडणवीस

Sep 14, 2024 - 16:25
 0
नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल : देवेंद्र फडणवीस

मुंबई : लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आहे. केंद्रातील पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

तसेच राज्यातील काही भाजपा नेत्यांमुळे तो जाहीर करत नसल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे. यातच एकनाथ खडसे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला. यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही एक खुलासा केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

साधारण २०१९ मधील ही गोष्ट आहे. एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. आम्ही दोघेच होतो. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की, नाथाभाऊ तुमची राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर त्यांना म्हणालो, देवेंद्रजी खरे सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितले की हे करणार, ते करणार, हे देणार वगैरे. पण, काही झाले नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांना सांगितले. यावर, ते म्हणाले की, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो की, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झाले मला माहिती नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पत्रकारांशी बोलताना याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

गणेशोत्सवानंतर यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल

भाजपा प्रवेश झाला आहे, परंतु, त्याची घोषणा केली जात नाही, असा एकनाथ खडसे यांचा दावा असून, याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ते काय म्हणाले, हे मी ऐकलेले नाही. मात्र, त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हा सर्वांना मान्यच आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, ज्या वेळेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. दिल्लीतील अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत असताना जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला. रक्षा खडसे उपस्थित होत्या. माझ्या गळ्यात भाजपाचा मफलर घातला. या घटनेला ५ ते ६ महिने होऊन भाजपाने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केले नाही. अजून वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow