राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची माहिती; रस्त्याचे मुख्य काम जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरून यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाचे मुख्य काम येत्या जुलै २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (NHAI) युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी यासंदर्भात महत्त्वाची आणि सकारात्मक माहिती दिली आहे. महामार्गावरील विविध टप्प्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांचा खडतर प्रवास अखेर संपून तो सुखकर व आनंददायी होणार आहे.
संगमेश्वर पुलाची दुसरी लेन चार ते पाच दिवसांत खुली होणार
महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संगमेश्वर येथील पुलाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलाची दुसरी लेन येत्या अवघ्या चार ते पाच दिवसांत वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. यामुळे संगमेश्वर बाजारपेठ आणि परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. यासोबतच पाली आणि लांजा येथील उड्डाणपुलांचे कामही वेगाने सुरू असून, हे दोन्ही पूल येत्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच गणेशोत्सवापूर्वीच वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज केले जाणार आहेत.
अहोरात्र काम सुरू; सर्व्हिस रोड आणि निंवळी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
महामार्गावर सध्या वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र काम सुरू आहे. आगामी गणेशोत्सवापूर्वी लांजा, पाली आणि संगमेश्वर येथील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे, जेणेकरून स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील लांब पल्ल्याची वाहतूक दोन्ही सुरक्षितपणे सुरू राहतील. दुसरीकडे, निंवळी येथील उड्डाणपुलाचे कामही आता पूर्णत्वाकडे आले असून हा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. मात्र, संपूर्ण महामार्गाचा विचार केला तर केवळ चिपळूण येथील पुलाच्या कामाला पूर्ण होण्यासाठी थोडा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.
नवीन अतिरिक्त सुधारणांसाठी १५० कोटींच्या निधीची आवश्यकता
महामार्गाचे काम जसजसे पुढे गेले, तसतशा स्थानिक गरजांनुसार काही अतिरिक्त सुधारणा आणि नवीन कामे सुचवण्यात आली आहेत. या नवीन कामांसाठी आराखडा विभागाने आधीच तयार केला असून, त्यासाठी आणखी १५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. परंतु, सद्या प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि महामार्ग लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी रस्त्याचे मुख्य काम पूर्ण झाल्याशिवाय ही नवीन अतिरिक्त कामे हाती घेतली जाणार नाहीत, असे महामार्ग विभागाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने यंदाचा गणपती उत्सव डोळ्यासमोर ठेवून कंबर कसली असून चाकरमान्यांचा प्रवास खड्डेमुक्त आणि वेगवान होणार हे आता निश्चित झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 27-06-2026













