रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले असून, शेतकरीही सुखावले आहेत. सध्या पावसाची उघडीप असली तरीही संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये तसेच प्रमुख आठ नद्यांच्या घटलेल्या पाणीपातळीतही आता हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
यंदा पावसाने दीर्घ प्रतीक्षा करायला लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पडणारा पाऊस यंदा तीन आठवडे उलटून गेले तरीही गायब होता. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीला सुरूवात केलेल्या शेतकऱ्यांचा जीव पावसाने पाठ फिरवल्याने टांगणीला लागला होता. पेरणी वाया जाणार अशी भीती वाटू लागली होती. अखेर रविवारी (२१ जून) पावसाला सुरूवात झाली आणि सारेच सुखावले.
या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे सावट दूर होण्यास मदत झाली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १२७.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरी १४.१७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळीही पावसाने जोर धरला होता. मात्र, त्यानंतर काही तास ऊन पडले होते. सायंकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला हाेता.
सध्या जगबुडी नदी (खेड) मध्ये ३.५० मीटर पाणीपातळी आहे. तसेच वाशिष्ठी नदी (चिपळूण) १.५४ मीटर, संगमेश्वरातील शास्त्री नदी ०.७० मीटर, सोनवी नदी ०.४० मीटर, व बावनदी १.२६ मीटर, लांजातील काजळी नदी (अंजनारी पूल) ११.३० मीटर व मुचकुंदी नदी ०.२५ मीटर आणि कोदवली नदी (राजापूर पूल, राजापूर) ०.६० मीटर इतकी पाणीपातळी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 27-06-2026













