बारामती: बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणातील एफआयआरपासून ते मुंबईतील भाजपच्या आंदोलनापर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानांनी राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार अपघात प्रकरणी महायुतीवर टीका
अजित पवार विमान अपघात प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्र सरकारने अजितदादा पवार अपघात प्रकरणी उशिरा का होईना एफआयआर दाखल करायला पाहिजे होता. काँग्रेस सरकार असलेल्या राज्याने रोहित पवारांच्या प्रयत्नाने एफआयआर दाखल करत अजितदादांना न्याय दिला. रोहित पवारांच्या प्रयत्नांचे महत्त्व काँग्रेसने समजून घेतले. ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा एफआयआर होत नाही, हे दुर्दैवी आहे.”
बारामती पोटनिवडणूक: “दादांना श्रद्धांजली देण्यासाठी मतदान करा”
पोटनिवडणुकीबाबत बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “अजित पवारांना जाऊन तीन महिने देखील झाले नाहीयेत आणि ही पोटनिवडणूक लागली, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आज आम्ही सर्व मतदानासाठी आलो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो अधिकार दिला आहे, एक नागरिक म्हणून तो बजावणे आपले कर्तव्य आहे. मी जनतेला विनंती करते की, मोठ्या संख्येने मतदान करून दादांना श्रद्धांजली द्यावी.”
शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल अपडेट
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदान करण्याची शरद पवार यांची तीव्र इच्छा होती. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना येता आले नाही. उन्हाळ्याचा कडाका असल्याने त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.”
मुंबईतील भाजप मोर्चावर सवाल
मुंबईत नुकत्याच झालेल्या भाजपच्या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी दुटप्पी भूमिकेवर टीका केली. त्या म्हणाल्या, “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांची गैरसोय करून आंदोलन करणे योग्य नाही. रस्ता अडवून आंदोलन करण्यावर त्यांनी आत्मचिंतन करावे. जर आंदोलन करायचेच होते, तर मैदानाची जागा उपलब्ध होती. आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला जागा निश्चित करून दिली जाते. मग सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना दुसरा न्याय का?”
विरोधकांची एकजूट आणि आगामी निवडणूक अंदाज
देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सुळे यांनी विविध राज्यांतील चित्र स्पष्ट केले:
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात खंबीरपणे लढत असून, तिथे त्यांचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- तामिळनाडू: स्टॅलिन (डीएमके) हे यंत्रणांच्या दबावाविरुद्ध लढत असून तिथे पुन्हा डीएमकेचे सरकार येईल.
- केरळ: केरळमध्ये काँग्रेसचे सरकार येईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
- आसाम: आसाममध्ये काँग्रेस भाजपला जोरदार टक्कर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांच्या या विधानांमुळे आगामी काळातील राजकारण आणि महाविकास आघाडीची पुढील रणनीती यावर चर्चांना सुरुवात झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:45 23-04-2026














