लांजा (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या दुरुस्तीच्या कामावरून झालेल्या वादातून तब्बल ४ लाखांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, कुरंग येथील सामूहिक मालकीच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा वाद झाला. हे घर तक्रारदार आणि साक्षीदार यांच्या मालकीचे आहे. या घराच्या छप्पराचे दुरुस्ती काम बाळकृष्ण रमेश पांचाल (रा. झर्ये, राजापूर) याने हाती घेतले होते.
काय घडली घटना? ही घटना १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. तक्रारदार श्रीपाद महादेव कदम (वय ५२, सध्या रा. मीरा रोड, ठाणे) यांनी यासंदर्भात लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदाराने संशयित बाळकृष्ण पांचाल याला “माझे घर सोडून इतरांच्या घराच्या छप्पराचे काम कर,” अशी सूचना दिली होती. मात्र, तक्रारदाराचे म्हणणे धुडकावून लावत संशयिताने दुरुस्तीचे काम सुरूच ठेवले.
४ लाखांची नासधूस तक्रारदाराच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत, संशयिताने घराच्या छप्पराची कौले, लाकडी रिपा आणि वासे काढून ते मोडून तोडून टाकले. एवढेच नाही तर, त्याने घरातील सामानाचीही मोठी नासधूस केली. या संपूर्ण प्रकारात अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस तपास सुरू या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, लांजा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 25-04-2026














