रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या उभारणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. नाचणे येथील सर्वे नंबर ९३ मधील २.५० हेक्टर जमीन केवळ १ रुपया नाममात्र भाड्याने, ९९ वर्षांच्या करारावर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज प्रशासनाकडून घेण्यात आला. या निर्णयामुळे रत्नागिरीतील प्रस्तावित केंद्रीय विद्यालयाच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने रत्नागिरीत केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यापूर्वीच मंजुरी दिली होती. राज्याचे उद्योग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता.
पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरीत केंद्रीय विद्यालय व्हावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी २६ जून २०२३ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. केंद्र सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर जागेचा प्रश्न प्रलंबित होता. आज जमिनीबाबत घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे विद्यालयाच्या प्रत्यक्ष उभारणीचा टप्पा आता जवळ आला आहे.
शैक्षणिक क्षेत्रासाठी मैलाचा दगड
या निर्णयावर बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की,
“रत्नागिरीच्या शैक्षणिक वैभवात भर टाकणारे हे केंद्रीय विद्यालय ठरणार आहे. नाचणे येथील मोक्याच्या ठिकाणी ही जमीन उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे उघडली जातील. रत्नागिरीच्या विकासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.”
नाचणे येथे हे विद्यालय साकारणार असल्याने शहर आणि नजीकच्या परिसरातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे हे केंद्र कोकणातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.














