Ratnagiri : एसटीच्या रत्नागिरी विभागाला बाप्पा पावला; गणेशोत्सवातून मिळाले तब्बल ८ कोटी रुपयांचे उत्पन्न

चाकरमान्यांचा लालपरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; परतीच्या प्रवासासाठी २ हजार ५०३ बसेस धावल्या

Ratnagiri News: गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या आणि परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने केलेल्या जादा बसेसच्या नियोजनाला चाकरमान्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांनी एसटीच्या ‘लालपरी’लाच पसंती दर्शवली असून, या गणेशोत्सव वाहतुकीतून रत्नागिरी विभागाला तब्बल ८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गणेशोत्सवातील बस नियोजन आणि गर्दी
गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून आपल्या मूळ गावी आले होते. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एकूण ५ हजारांहून अधिक जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी तब्बल ३ हजार ५०० बसेस एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. तर रत्नागिरी आगारासह जिल्ह्यातील इतर आगारांच्या एकूण ३ हजारांहून अधिक बसेस विविध मार्गांवर धावल्या.

जाताना आणि परतीच्या प्रवासातून उत्पन्न
गणेशोत्सवासाठी गावी जाताना ५५० एसटी बसेस धावल्या होत्या, ज्यातून एसटी महामंडळाला १ कोटी ५० लाख (दीड कोटी) रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर सण संपल्यानंतर २८ सप्टेंबरपर्यंत परतीच्या प्रवासासाठी मुंबई आणि पुण्याकडे तब्बल २ हजार ५०३ बसेस सोडण्यात आल्या होत्या. या परतीच्या वाहतुकीतून ६ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, जाताना आणि परतीचे मिळून रत्नागिरी विभागाला एकूण ८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

लाखो सवलतधारकांनी घेतला लाभ
एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक सवलती लागू करण्यात आल्या होत्या. यामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि महिलांसाठी ५० टक्के तिकीट सवलत देण्यात आली होती. या सवलतींचा फायदा घेत लाखो प्रवाशांनी तसेच काहींनी ग्रुप बुकिंग करून एसटीने प्रवास केला, ज्यामुळे एसटी विभागाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Tata safari

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:08 07-10-2026