पुणे/भोर: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी आजीच्या गावी आलेल्या एका चार वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडी ही सुट्टीसाठी आपल्या आजीच्या घरी आली होती. दुपारी घरासमोर खेळत असताना गावातील ६५ वर्षीय आरोपीने तिला आमिष दाखवून एका गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केल्यानंतर, आपले कृत्य उघड होऊ नये या भीतीने आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी नराधमाने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली गाडून ठेवला होता.
CCTV फुटेजमुळे पाप उघड झाले
दुपारच्या सुमारास मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडली नाही, तेव्हा परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यात आले. यामध्ये आरोपी चिमुरडीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्ट दिसला. संशयावरून गोठ्यात तपास केला असता, शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या चिमुकलीचा मृतदेह आढळला. हे दृश्य पाहून ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पोलीस स्टेशनबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आक्रमक झाले. पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या असल्या, तरी संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी चिमुरडीचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर नेला. तिथेच मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजकीय पडसाद: सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणाल्या:
“एका चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठेचून मारले जाते, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. सर्वसामान्य माणूस जगला काय किंवा मेला काय, याच्याशी गृहमंत्र्यांना काही देणे-घेणे नाही. ते स्वतःला चाणक्य आणि सुपरमॅन म्हणवून घेण्यात व्यस्त आहेत. आपण एका अत्यंत असुरक्षित राज्यामध्ये राहत आहोत, हेच यातून सिद्ध होते.”
नराधमाला बेड्या
भोर पोलिसांनी या प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि हत्येचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पंचक्रोशीतून केली जात आहे.
घटनेचे ठळक मुद्दे:
- ठिकाण: भोर तालुका, पुणे.
- वय: ४ वर्षांची पीडित मुलगी, ६५ वर्षीय आरोपी.
- गुन्हा: लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या.
- कारवाई: आरोपीला पोलिसांनी केली अटक.
- आंदोलन: ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनबाहेर रास्ता रोको.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:48 02-05-2026














