HSC Result 2026: बारावी निकालाचा टक्का यंदा घसरला! जाणून घ्या निकालाची महत्त्वाची आकडेवारी

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा (HSC Result 2026) निकाल आज अखेर जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची सांख्यिकीय माहिती सादर केली. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट पाहायला मिळाली आहे.

निकालाची महत्त्वाची आकडेवारी:

  • राज्याचा एकूण निकाल: ८९.७९ %
  • मुलींचा निकाल: ९३.१५ %
  • मुलांचा निकाल: ८६.८० %
  • अव्वल विभाग: कोकण (९४.१४ %)

मुलींचे वर्चस्व कायम

यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्क्यांनी अधिक आहे. राज्यात जिथे ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तिथे मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.८० टक्के इतके आहे.

निकालाचा टक्का घसरला

मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा निकालात घसरण झाली आहे:

  • २०२४: ९३.३७ %
  • २०२५: ९१.८८ %
  • २०२६: ८९.७९ % (यंदा २.०९ टक्क्यांची घट)

परीक्षा पारदर्शकतेसाठी कठोर पावले

अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, यंदा राज्यातील ९ विभागीय मंडळांतून सुमारे १४ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी १५३ विषयांसाठी परीक्षा दिली होती. परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी बोर्डाने कडक पावले उचलली होती. या काळात:

  • गैरप्रकारांप्रकरणी एकूण १५ एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले.
  • कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल १०० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

निकाल ऑनलाईन कसा पाहाल? (How to Check Online)

आज दुपारी १ वाजता खालील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होईल:

  1. mahresult.nic.in
  2. hscresult.mkcl.org
  3. hscresult.mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वरीलपैकी कोणत्याही एका वेबसाईटला भेट द्या.
  2. ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  3. तुमचा सीट नंबर (Seat Number) टाईप करा.
  4. आईच्या नावातील पहिली तीन अक्षरे प्रविष्ट करा.
  5. ‘View Result’ वर क्लिक करा आणि निकालाची प्रिंट काढून घ्या.

SMS वर निकाल मिळवण्यासाठी:

वेबसाईटवर लोड जास्त असल्यास विद्यार्थी एसएमएसद्वारे निकाल मिळवू शकतात:

  • तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये MHHSC (स्पेस) Seat Number टाईप करा.
  • हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.
  • काही वेळातच तुमचा निकाल मोबाईलवर एसएमएस स्वरूपात प्राप्त होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 02-05-2026