रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळाला. सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर दुपारी संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात पावसाचे धूमशान
संगमेश्वर तालुक्यातील देवळे, देवरुख, आरवली आणि परिसर अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढला. दुपारी अचानक विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, देवळे परिसरात अनेक ठिकाणी मोठी झाडे कोलमडून पडली. या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
आंबा बागायतदारांच्या चिंतेत भर
कोकणातील राजा समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात असतानाच या अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे झाडांवरील आंबा गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणारा आंबा बागायतदार या नवीन संकटामुळे पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यात कुठे कशी स्थिती?
- लांजा-नाणीज: लांजा, नाणीज आणि पाली परिसरात सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. लांज्यात सायंकाळी ६ च्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या.
- उत्तर रत्नागिरी: चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर या उत्तर रत्नागिरीतील तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाळी ढगाळ वातावरण होते, मात्र येथे पावसाची नोंद झालेली नाही.
- राजापूर: जिल्ह्याच्या दक्षिण भागात असलेल्या राजापुरात मात्र पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती.
उन्हाच्या चटक्यानंतर पावसाची हजेरी
जिल्ह्यात सकाळपासून पावसाळी वातावरण असतानाही दुपारपर्यंत उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, दुपारनंतर वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आणि पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:29 08-05-2026














