लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला रिक्षानी मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, रिक्षामधील चार महिला प्रवासी देखील जखमी झाल्या आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
नियंत्रण सुटल्याने भीषण धडक
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अविनाश चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. कणगवली शिंदेवाडी, ता. लांजा) हा आपल्या रिक्षामधून (एमएच ०८ बीसी ३२५६) चार महिला प्रवाशांना घेऊन ओणी मार्गे लांजाच्या दिशेने येत होता. रिक्षा वाकेड घाटात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच ४६ सीयू ०५७८) रिक्षानी मागून भीषण धडक दिली.
रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर
या धडकेत रिक्षाच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून चालक अविनाश शिंदे याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच रिक्षामधील चारही महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
राजापूरहून लांजाकडे येत असताना अपघात
अविनाश शिंदे हा राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथून महिला प्रवाशांना घेऊन निघाला होता. जाताना तो साटवली मार्गे गेला होता, मात्र परतीच्या प्रवासात ओणी मार्गे येत असताना वाकेड घाटात हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
घाटातील धोकादायक वळणे आणि उभ्या असलेल्या जड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:29 08-05-2026














