“नृत्यसंध्या” भरतनाट्यम नृत्याविष्कार उत्साहात संपन्न

रत्नागिरी : साईश्री नृत्यकला मंदिर आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “नृत्यसंध्या” हा भरतनाट्यम नृत्याविष्कार दिनांक ८ मे रोजी वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे संध्याकाळी ६ वाजता उत्साहात संपन्न झाला.

भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकाराचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गेली २६ वर्षे साईश्री नृत्यकला मंदिरतर्फे गुरु सौ. मिताली भिडे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने माननीय प्रीती सुर्वे मॅडम (बालकल्याण सभापती व नगरसेविका, रत्नागिरी नगर परिषद), मेधा कुलकर्णी मॅडम (नगरसेविका), ॲड. राजशेखर मलुष्टे, ॲड. विलास पाटणे, मनोज गांधी आणि रुपाली लिमये मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रीती सुर्वे मॅडम म्हणाल्या की, “भरतनाट्यमसारखी शास्त्रीय कला इतकी वर्षे जपणे आणि दरवर्षी अशा दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.” त्यांनी गुरु मिताली भिडे आणि साईश्री नृत्यकला मंदिर यांना शुभेच्छा दिल्या. ॲड. विलास पाटणे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या, तर मेधा कुलकर्णी मॅडम यांनी “ही कला अशीच पुढे चालू राहो आणि अधिकाधिक शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम होत राहोत,” अशा शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून हिंद सायकल मार्टचे राजेश महागावकर, सोहन क्लॉथचे मनोज गांधी आणि इन्फिगो आय केअरचे ठाकूर देसाई यांचे सहकार्य लाभले.

“नृत्यसंध्या” हा कार्यक्रम गेली १५ ते २० वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. भरतनाट्यममध्ये “अरंगेत्रम्” हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो; मात्र काही कारणांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अरंगेत्रम् सादर करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर “नृत्यसंध्या” हा कार्यक्रम अरंगेत्रम्‌च्या धर्तीवर सादर केला जातो.

साईश्री नृत्यकला मंदिराच्या १२ शिष्यांनी या कार्यक्रमात आपली कला सादर केली. संपूर्ण भरतनाट्यम “मार्गम” या कार्यक्रमात सादर करण्यात आला. लाईव्ह म्युझिकवर आधारित अत्यंत सुंदर रचना विद्यार्थिनींनी सादर केल्या. विशेषतः “दशावतार” ही रचना प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, नृत्यदिग्दर्शन आणि संकल्पना गुरु मिताली भिडे यांची होती.

भरतनाट्यम हा नृत्यप्रकार तामिळनाडूतील असल्यामुळे त्यामध्ये कर्नाटक संगीताचा समावेश असतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, पालकांना आणि प्रेक्षकांना कर्नाटक संगीताची ओळख आणि समज मिळाली.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शास्त्रीय नृत्याची आवड निर्माण होत असून त्याचा प्रचार व प्रसारही होत आहे. तसेच भारतीय नृत्यपरंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कार्यक्रमातून केला जात आहे.

रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुंदर कलाविष्काराचा आस्वाद घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 11-05-2026