नाशिक: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) रविवारी नाशिकमध्ये चाकणकर यांची तब्बल ५० मिनिटे चौकशी केली. या चौकशीत चाकणकर यांनी खरातशी असलेल्या संबंधांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तपास पथकाची प्रश्नांची सरबत्ती
सकाळी गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आणि डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांनी चाकणकर यांचा जबाब नोंदवला. यावेळी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली:
- अशोक खरातशी नेमके संबंध काय?
- खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’मधील तुमची भूमिका काय होती?
- कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांबाबतचे सत्य काय?
- महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तक्रारींच्या निवारणात खरातला मदत केली का?
‘त्याला गुरू मानले होते’ – चाकणकरांचा खुलासा
चौकशीदरम्यान रूपाली चाकणकर यांनी खरातसोबतच्या संबंधांवर आपली बाजू मांडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी खालील खुलासे केले आहेत:
“माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहे. केवळ आध्यात्मिक श्रद्धेपोटी मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला गुरू मानले होते. मात्र, खरातची दुसरी गुन्हेगारी बाजू मला ठाऊक नव्हती.”
तसेच, खरातसोबत कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा आणि कोणासही त्याच्याकडे जाण्याचा आग्रह केला नसल्याचा दावाही त्यांनी यावेळेस केला.
तीन वेळा कार बदलून नाशिकला एन्ट्री
या चौकशीची दुसरी महत्त्वाची चर्चा म्हणजे चाकणकर यांनी नाशिकला येण्यासाठी अवलंबलेला गुप्त मार्ग. गेल्या महिन्यात पत्र देऊनही तांत्रिक कारणास्तव टाळाटाळ करणाऱ्या चाकणकर यांना अखेर रविवारी हजर राहावेच लागले. पुण्यातून नाशिकला येताना त्यांनी ओळख लपवण्यासाठी तीन वेळा कार बदलल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे मुख्य आरोप?
अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खरात आणि चाकणकर यांचे कनेक्शन समोर आले होते. चाकणकर या खरातच्या सिन्नर येथील शिवनिका ट्रस्टवर सदस्य होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून त्यांनी खरातला पाठीशी घातले का, याचा तपास आता एसआयटी करत आहे.
पुढील दिशा काय?
५० मिनिटांच्या या जबाबातून अनेक तांत्रिक बाबी समोर आल्या असून, एसआयटी आता खरात आणि चाकणकर यांच्या कॉल रेकॉर्ड्सची पडताळणी करणार आहे. या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तपासाअंती काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 11-05-2026














