रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. या बैठकांनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नाणार बॉक्साईट प्रकल्प, आंबा बागायतदारांचे प्रश्न, ‘सारथी’चे विभागीय कार्यालय आणि प्रशासकीय इमारतींबाबत मोठे निर्णय जाहीर केले. यामुळे रत्नागिरीकरांना आणि विशेषतः आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द
नाणार येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनीही स्थानिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. तसेच राजापूर पंचायत समितीनेही सुनावणी रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिकांचा १०० टक्के विरोध प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. लोकांचा तीव्र विरोध आणि शेतकऱ्यांची नकारात्मक भूमिका लक्षात घेऊन, प्रशासनाने अखेर २० आणि २८ तारखेला होणारी या प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत लोक विश्वासात घेऊन संमती देत नाहीत, तोपर्यंत कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सामंत यांनी मांडली.
आंबा बागायतदारांना मोठा दिलासा; कॅनिंगचा दर ५० रुपयांवर
सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये आंब्याला वाढीव दर मिळाल्याच्या बातम्या फिरत होत्या, मात्र प्रत्यक्षात दर वाढले नसल्याने बागायतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ‘एक्झोटिक देसाई कॅनिंग’ व्यवस्थापन आणि आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, आंब्याला मिळणारा ३२ रुपये प्रतिकिलोचा दर थेट ५० रुपये प्रतिकिलो करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कॅनिंग कंपनीने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या निर्णयाचे लेखी इतिवृत्त (Minutes) तयार करण्यात आले असून, यामुळे आंबा उत्पादकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
रत्नागिरीत सुरू होणार ‘सारथी’चे विभागीय कार्यालय
मराठा समाजातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व लाभ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत ‘सारथी’ संस्थेचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. यावर तोडगा काढत, पालकमंत्री सामंत यांनी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) महेश पाटील यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. याचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवला जाणार असून, रत्नागिरीत कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तसेच, ‘सारथी’शी जोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणही लवकरच सुरू केले जाणार आहे.
रत्नागिरी नगरपालिकेची नवी इमारत आणि प्रशस्त ‘सेतू’ केंद्र
रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, अलीकडे झालेल्या पावसामुळे लोकार्पण सोहळा ७ ते ८ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, ‘ब’ वर्ग नगरपालिकांमध्ये महाराष्ट्रातील पहिली कॉर्पोरेट दर्जाची इमारत रत्नागिरीत उभी राहिली आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तसेच, सध्याचे ‘सेतू सुविधा केंद्र’ अत्यंत अरुंद जागेत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. आता जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्यानंतर, समोरची जुनी इमारत रिक्त होईल. या जुन्या इमारतीत अत्यंत प्रशस्त आणि सुसज्ज असे ‘सेतू’ कार्यालय सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय आज घेण्यात आला. यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असून भाड्याच्या जागेत असणारी सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.














