नाणिजमध्ये महामार्गाच्या अर्धवट कामाचा ग्रामस्थांना फटका! घरात आणि दुकानांत शिरले पाणी; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी

रत्नागिरी (नाणिज): कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नाणिज परिसरात सुरू असलेल्या महामार्गाच्या अर्धवट कामाचा भीषण फटका स्थानिक नागरिकांना बसला आहे. शनिवारी झालेल्या वळवाच्या पावसामुळे महामार्गावरील पाणी थेट लोकांच्या घरात, अंगणात आणि दुकानांमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ग्रामस्थांनी ठेकेदार कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पाच मिनिटांच्या पावसात दाणादाण

गेल्या दोन दिवसांपासून नाणिज पंचक्रोशीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे महामार्गावरून येणारे पाणी आऊटलेटअभावी थेट सर्व्हिस रोडवर आले. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे आणि रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना पावसाच्या पाण्यात मोठी धावपळ करावी लागली.

गटारांची कामे वर्षभरापासून रखडलेली

भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी चिराग खटकूळ यांनी ठेकेदार कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना गटारांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. “गतवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र वर्षभर उलटूनही ठेकेदार कंपनीने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही,” असे खटकूळ यांनी नमूद केले.

मान्सूनपूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान

अवकाळी पावसामुळे जर ही परिस्थिती असेल, तर येत्या मान्सूनमध्ये (पावसाळ्यात) नाणिज ग्रामस्थांची काय अवस्था होईल, असा यक्षप्रश्न उपस्थित केला जात आहे. मान्सून सुरू व्हायला आता केवळ १५ ते २० दिवस शिल्लक आहेत. या अल्प कालावधीत ठेकेदार कंपनीने तातडीने आऊटलेट आणि गटारांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Happy journey english

ग्रामस्थांचा इशारा

जर पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था झाली नाही, तर मान्सूनमध्ये गंभीर समस्या उद्भवू शकते. ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 11-05-2026