रत्नागिरी : ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा आणि सेवाभावाला तंत्रज्ञानाची जोड देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात आनंदधाम वालावलकर डिजिटल कम्युनिटी कार्यक्रम अंतर्गत डिजिटल डेटा एंट्री उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
वैद्यकीय संचालक डॉ. सुवर्णा पाटील, अधिष्ठाता मानसिंगराव घाटगे, डॉ. अनघा मोडक, फिजिओथेरपी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर तसेच समुदाय औषध विभागप्रमुख डॉ. गजानन वेल्हाळ हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला अधिक प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
रुग्ण म्हणजे केवळ आजार किंवा निदान नसते, तर ती एक कहाणी असते, एक कुटुंब असते, एक संघर्ष असतो. गेली अनेक वर्षे डॉक्टर आणि विद्यार्थी गावोगावी जाऊन लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवत होते, पण त्या सेवांची कागदापुरती मर्यादित राहायची. पावसात हरवणाऱ्या किंवा काळाच्या ओघात विसरल्या जाणाऱ्या त्या कागदपत्रांना आता डिजिटल स्वरूप देऊन त्यांना अधिक टिकाऊ, अचूक आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न आहे. मानसोपचार तज्ज्ञ स्वाती सोनावणे आणि रूपाली चव्हाण यांनी गेली कित्येक वर्षे याकामी विशेष मेहनत घेतली आहे.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली ही संस्था म्हणजे केवळ रुग्णालय नाही, तर एक सामाजिक चळवळ आहे. १९९६ मध्ये सुरू झालेल्या रुग्णालयाने आणि २०१५ मध्ये स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाने ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे. सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी शिक्षण आणि सर्वांसाठी रोजगार या तत्त्वांवर उभे राहून संस्थेने समाजसेवेची परंपरा अखंडपणे पुढे नेली आहे
यावेळी विविध योजनांचा आढावा घेताना त्यांच्या सामाजिक परिणामांची जाणीव प्रकर्षाने झाली. लाडू गोपाळ योजनेद्वारे कुपोषणविरुद्धची लढाई लढली जात आहे. यशोदा व माहेर योजनेतून मातृत्वाला आधार दिला जात आहे. दंततचिकित्सा योजनेद्वारे तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून कॅन्सर प्रतिबंधाचा प्रयत्न केला जात आहे, तर सुदामा, सुकन्या आणि बलराम योजना शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बालविकासासाठी कार्यरत आहेत. या योजना केवळ उपक्रम नसून अनेक कुटुंबांच्या आत आशेचा किरण ठरत आहेत.
आता प्रत्येक रुग्णाची माहिती, प्रत्येक बदल आणि प्रत्येक प्रगती रिअल टाइममध्ये नोंदवली जाणार आहे. ज्यामुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 13-05-2026














