जयसिंगपूर: शिरोळ तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या प्रियकराने फोन उचलला नाही आणि तो टाळाटाळ करत असल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीने स्वतःचेच अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित युवकावर ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. प्रियकर आपला फोन उचलत नसल्याने आणि संवाद साधत नसल्याने ही मुलगी प्रचंड तणावाखाली आणि रागात होती. याच रागाच्या भरात तिने स्वतःकडे असलेले तीन अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक केल्याचे बोलले जात आहे. हे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
तपासाची चक्रे फिरली; लॉज मालकही अडचणीत
व्हायरल झालेले व्हिडिओ ज्या ठिकाणी चित्रित झाले, त्या जागेचा शोध पोलिसांनी घेतला असता, हे कृत्य हातकणंगले तालुक्यातील एका लॉजवर घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून शिरोळ पोलिसांनी आता संबंधित लॉज मालकालाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. अल्पवयीन मुलांना नियमांचे उल्लंघन करून लॉजमध्ये प्रवेश कसा देण्यात आला? याची कसून चौकशी सुरू असून, लॉज मालकावरही कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिसांची सावध भूमिका
या गंभीर प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी शिरोळचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून पिडीता अल्पवयीन आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने तांत्रिक बाबी आणि माहिती सध्या सार्वजनिक करता येणार नाही.” दरम्यान, हे व्हिडिओ मुलीने स्वतःहून व्हायरल केले आहेत की अन्य कोणी बनावट (Fake) अकाऊंट तयार करून हे कृत्य केले आहे, याचाही सखोल तपास पोलीस करत आहेत.
पालकांसाठी धोक्याची घंटा
या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाचा वाढता गैरवापर आणि अल्पवयीन मुलांमधील टोकाची पावले उचलण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.














