रत्नागिरी (कोतवली): रत्नागिरी तालुक्यातील कोतवली येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीचे अन्य एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून पत्नीने पोलिसांत तक्रार केली. याचाच राग मनात धरून पतीने चक्क स्वतःचेच राहते घर पेटवून दिले. ही घटना १२ मे रोजी दुपारी टेप-भोईवाडी परिसरात घडली असून, या भीषण आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी सचिन सत्यवान जुवळे (रा. कोतवली) याचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. अखेर पत्नीने या त्रासाला कंटाळून रत्नागिरी पोलीस ठाण्यातील महिला कक्षात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत महिला समुपदेशन केंद्राच्या विशाखा चव्हाण यांनी सचिन जुवळे आणि त्याच्या प्रेयसीला चौकशीसाठी बोलावले होते.
रागाच्या भरात घर केले खाक
पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याचा राग सचिनला अनावर झाला. त्याने आपल्या पत्नीचे आणि स्वतःचे राहते घर नष्ट करण्याच्या हेतूने घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने घराला आग लावून दिली.
ही आग इतकी भीषण होती की, घराच्या छताचे लाकडी वासे पूर्णपणे जळून खाक झाले आणि वरील सर्व कौले खाली कोसळली. आगीत घरातील धान्य, कपडे आणि इतर गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आरोपी पतीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी सचिनच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी पोलीस ठाण्यात सचिन जुवळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीत झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.














