खेड (रत्नागिरी): खेड तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठणवाडी या तीन वाड्यांमध्ये रसायनयुक्त पिवळसर पाण्याचा पुरवठा झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेला आता १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे, मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) तपासणीसाठी पाठवलेल्या पाण्याचे नमुने आणि त्याचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. यामुळे हा अहवाल नेमका कधी येणार आणि प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
२२ एप्रिल रोजी पिरलोटे येथील या तीन वाड्यांना रसायनयुक्त पिवळसर पाण्याचा पुरवठा झाला होता. हे दूषित पाणी प्यायल्यामुळे या परिसरातील १६ रुग्णांची प्रकृती बिघडली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते.
नमुने घेण्याची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच?
या घटनेला दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला असूनही अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. या अहवालातूनच पाण्यात नेमके कोणते रसायन मिसळले होते आणि त्याला जबाबदार कोण, याचा उलगडा होणार आहे. मात्र, अहवालाला होत असलेल्या दिरंगाईमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही नमुने घेण्याची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच राहिली का? अशी शंका आता पिरलोटेवासीय व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
“आमच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई होण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही प्रशासन शांत का आहे?” असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. पंधरा दिवस उलटूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याविषयी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
आता तरी संबंधित विभाग या अहवालाबाबत तातडीने हालचाल करणार का आणि पिरलोट्यातील जनतेला न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














