नवी दिल्ली: नीट यूजी (NEET UG) परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मोठा निर्णय घेतला आहे. एनटीएने अधिकृतपणे नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून, आता ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी देशभर पुन्हा घेतली जाणार आहे. ३ मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सोशल मीडियावरून दिली माहिती
एनटीएने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या निर्णयाची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ही तारीख निश्चित करण्यात आली असून, “विद्यार्थी आणि पालकांनी केवळ अधिकृत वेबसाईटवरील माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन एनटीएने केले आहे.
पेपरफुटीचे धक्कादायक वास्तव
यावर्षी सुमारे २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, ३ मे रोजी झालेल्या परीक्षेचे प्रश्न सोशल मीडियावर आणि ‘गेस पेपर’मध्ये जसेच्या तसे आढळले होते. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की:
- महाराष्ट्रातील काही खाजगी क्लासेसमध्ये परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेचे संच पोहोचले होते.
- एका खाजगी क्लासने घेतलेल्या सराव परीक्षेत मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आले होते.
- प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांन विकल्या गेल्याचे पुरावे मिळाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे: अर्ज आणि शुल्काचे काय?
नव्याने परीक्षा जाहीर झाली असली तरी विद्यार्थ्यांना काही बाबींमध्ये दिलासा देण्यात आला आहे: १. नव्याने अर्ज करण्याची गरज नाही: ज्या विद्यार्थ्यांनी आधी नोंदणी केली आहे, त्यांची जुनी नोंदणीच ग्राह्य धरली जाईल. २. परीक्षा केंद्र: विद्यार्थ्यांची पूर्वीची परीक्षा केंद्रांची निवड कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. ३. अतिरिक्त शुल्क नाही: फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही नवीन शुल्क (Fee) भरावे लागणार नाही. आधी भरलेली फीच या परीक्षेसाठी ग्राह्य धरली जाईल.
NTA च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
एवढ्या मोठ्या स्तरावर घेतली जाणारी परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’ संस्थेच्या पारदर्शकतेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर आता शंका उपस्थित केली जात आहे.
महत्त्वाची टीप: विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी www.nta.ac.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 15-05-2026














