नवी दिल्ली: नीट पेपरफुटीच्या (NEET UG Paper Leak) पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) जाहीर केल्यानुसार, रद्द झालेली नीट परीक्षा आता रविवार, २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या नवीन परीक्षेत विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारने वेळेत वाढ आणि फी माफीसह अनेक मोठे बदल केले आहेत.
शिक्षणमंत्र्यांची मोठी कबुली: “शून्य सहनशीलता धोरणामुळेच परीक्षा रद्द”
या प्रकरणावर बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “१२ मे रोजी जेव्हा आम्हाला पेपरफुटीची माहिती मिळाली, तेव्हा कोणत्याही चुकीच्या किंवा अपात्र उमेदवाराची वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होऊ नये, अशी आमची भूमिका होती. पेपरफुटीच्या बाबतीत सरकारचे ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरण आहे. म्हणूनच आम्ही तातडीने आणि जबाबदारीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.”
नव्या फेरपरीक्षेत झालेले ‘हे’ ४ मोठे बदल:
१. परीक्षेच्या वेळेत १५ मिनिटांची वाढ: विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी आता १५ मिनिटे अधिक मिळणार आहेत. नवीन वेळेनुसार परीक्षा दुपारी २:०० वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल.
२. परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ (Zero Fee): या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. तसेच आधी भरलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहे.
३. पसंतीचे शहर निवडण्याची मुभा: विद्यार्थ्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा शहर (Exam City) निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे.
४. प्रवेशपत्र (Admit Card) कधी मिळणार? या परीक्षेसाठीची नवीन प्रवेशपत्रे १४ जून २०२६ पर्यंत उपलब्ध करून दिली जातील.
३ मे रोजीच्या परीक्षेत २२ लाखांहून अधिक विद्यार्थी
यापूर्वी ३ मे रोजी ही परीक्षा भारतातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये तब्बल ५,४०० हून अधिक केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला २२.७९ लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, १२ मे रोजी पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.
पेपर लीक प्रकरणात मोठी कारवाई: सीबीआयकडून ७ जणांना अटक
या गंभीर प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करत असून आतापर्यंत देशाच्या विविध भागांतून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
- ५ आरोपींना कोठडी: राजस्थानचे मंगीलाल बिनवाल, दिनेश बिनवाल, विकास बिनवाल, गुरुग्रामचा यश यादव आणि नाशिकचा शुभम खैरनार यांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने ७ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
- महाराष्ट्रातूनही अटक: याशिवाय सीबीआयने महाराष्ट्रातून पुण्याची ब्युटिशियन मनीषा वाघमारे आणि नाशिकमधून धनंजय लोखंडे या दोघांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 15-05-2026














