एक उदाहरण दाखवा जातीयवाद केल्याचं, ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं? शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : जातीवाद पसरवत शरद पवार यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“एक उदाहरण दाखवा जातीयवाद केल्याचं, ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही त्यांच्याबद्दल आपण काय भाष्य करायचं? त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण महाराष्ट्रातील जनता शहाणी आहे, संपूर्ण राज्याभरातून त्यांचा मागच्या निवडणुकीत एकच आमदार निवडून दिला होता,” असा टोला पवार यांनी लगावला आहे. बारामती येथील पत्रकार परिषदेतील ते बोलते होते.

शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला. “या सरकारचं वैशिष्ट्य आहे. विमानाने उमेदवारांना एबी फॉर्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांतून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. काही जणांची नावे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या आधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करू नये अशी गळ घातली आहे,” असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.

दरम्यान, “महाविकास आघाडीतील बंडखोर, नाराज शांत होतील. हरियाणाच्या निवडणुकीचा महाराष्ट्रातील निवडणुकीत काडीचाही परिणाम होणार नाही. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने आपण चित्र बदलू शकतो, परिवर्तन घडवू शकतो,” असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 02-11-2024