खेल वृत्त: आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मिळालेल्या धडाकेबाज विजयानंतरही लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऋषभ पंतवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघाने संथ गतीने गोलंदाजी (Slow Over Rate) केल्यामुळे पंतला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, चालू हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे अशा प्रकारचा दंड सोसावा लागणारा ऋषभ पंत हा आयपीएलमधील आठवा कर्णधार ठरला आहे.
आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन
आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा संघ निर्धारित वेळेत आपल्या २० ओव्हर्स पूर्ण करू शकला नाही. लखनऊच्या संघाचा आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत केलेला हा चालू हंगामातील पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार केवळ कर्णधार ऋषभ पंतवर १२ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि ठरलेली वेळ कोलमडू नये, म्हणून सर्वच संघांना मर्यादित वेळेत ओव्हर्स पूर्ण करणे बंधनकारक असते.
पुन्हा तीच चूक झाल्यास कर्णधारावर येऊ शकते बंदी!
लखनऊच्या संघाने या सामन्यात चेन्नईवर शानदार विजय मिळवला असला, तरी या दंडात्मक कारवाईमुळे आता पंत आणि लखनऊ व्यवस्थापनाला आगामी सामन्यांमध्ये रणनीतीसोबतच वेळेचेही गणित अचूक ठेवावे लागणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, जर संघाने पुन्हा हीच चूक दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा केली, तर दंडाची रक्कम वाढू शकते आणि कर्णधारावर एका सामन्याची बंदी देखील लादली जाऊ शकते.
लखनौचा चेन्नईवर दणदणीत विजय; मिचेल मार्श चमकला
लखनौ आणि चेन्नई यांच्यात आयपीएल २०२६ मधील ५९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने लखनौसमोर १८८ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली.
लखनौने अवघ्या १६.४ षटकात केवळ ३ गमावून हा सामना सात विकेट्सने खिशात टाकला. लखनौच्या या वादळी विजयात सलामीवीर मिचेल मार्शने मुख्य भूमिका बजावली. त्याने अवघ्या ३८ चेंडूत ९० धावांची स्फोटक खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. त्याच्या या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ (Player of the Match) म्हणून गौरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 16-05-2026













