Ratnagiri: ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार; जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून जिल्हावासीयांना एकाच वेळी कडक उन्हाचा उकाडा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात सध्या अधूनमधून पावसाची हजेरी लागत आहे. यंदा पाऊस लवकर येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात मळभाचे वातावरण तयार झाले असून पाऊस कुठल्याही क्षणी पडेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

रत्नागिरीत कमालीचे उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोबतच, जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Tata harrier

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवसांचे वेळापत्रक असे असेल:

  • १८ मे: हवामानात किंचित बदल होऊन हलका ते मध्यम पाऊस किंवा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • १९ आणि २० मे: या दोन दिवसांत पाऊस काहीसा ओसरेल; मात्र तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता कायम राहील.

उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण

पाऊस लवकर येण्याचे संकेत मिळत असले तरी सध्या उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. शनिवारी आणि रविवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. यामुळे प्रचंड उकाडा वाढला असून नागरिकांना घामाच्या धारांनी त्रस्त केले आहे.

सकाळी अगदी ८ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता कमालीची वाढू लागते, ज्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासूनच नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आणखी काही दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 18-05-2026