Ratnasetu App Ratnagiri: ‘रत्नसेतू’ ॲपद्वारे नागरिकांना जलद ऑनलाइन सेवा!

Ratnasetu App Ratnagiri (रत्नसेतू ॲप रत्नागिरी) च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना विविध प्रशासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा यशस्वी उपक्रम सुरू केला आहे. ‘मिशन रॅपिड’ अंतर्गत सुरू असलेल्या या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना विविध प्रकारच्या परवानग्या आणि पडताळणी प्रमाणपत्रे आता घरबसल्या ऑनलाइन मिळवणे शक्य झाले आहे.

ऑनलाइन मिळणाऱ्या प्रमुख सेवा आणि उद्दिष्ट

या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना खालील सेवा ऑनलाइन पुरवल्या जात आहेत:

  • चारित्र्य पडताळणी (Character Verification)
  • पासपोर्ट पडताळणी (Passport Verification)
  • ड्रोन परवाग्या (Drone Permission)
  • ध्वनिक्षेपक परवाना (Loudspeaker Permission)
  • सशुल्क बंदोबस्त, मिरवणूक व सभा परवानग्या

नागरिकांना त्यांच्या अर्जाच्या सद्यस्थितीची (Status) वेळोवेळी अचूक माहिती मिळावी, सेवांबाबत कोणताही संभ्रम राहू नये आणि पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक ऑनलाइन सेवेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र साहाय्यक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, अर्ज निकाली काढण्याची नियमित नोंद ठेवली जात आहे.

कामगिरीची आकडेवारी: १ मे २०२५ ते २६ जून २०२६ पर्यंतचा अहवाल

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. १ मे २०२५ ते २६ जून २०२६ या कालावधीत ‘रत्नसेतू’ ॲपद्वारे वितरित करण्यात आलेल्या परवानग्यांची अधिकृत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे: २२ हजार ३८४
  • ध्वनिक्षेपक परवाने: २,९१४
  • पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्रे (परदेशगमनासाठी): १४०
  • सभा-मिरवणूक परवानग्या: १३१
  • खुली ठिकाणे कार्यक्रम परवानग्या: ३०
  • बंदिस्त ठिकाणे कार्यक्रम परवानग्या: १९

विशेष म्हणजे, या कालावधीत प्राप्त झालेल्या सर्वच्या सर्व अर्जांचा १०० टक्के निपटारा करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 03-07-2026