PM Modi : स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल.. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा

नवी दिल्ली/द हेग:

“कोरोना महामारीनंतर सुरू झालेली युद्धे आणि वाढती जागतिक अस्थिरता यामुळे मागील अनेक दशकांतील विकास धोक्यात येऊ शकतो. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर जगातील एक मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीत ढकलली जाऊ शकते आणि आजवरच्या सर्व उपलब्धी नष्ट होऊ शकतात,” असा गंभीर आणि धोरणात्मक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

नेदरलँड्समधील ‘द हेग’ येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी जगासमोरील आव्हाने मांडली, तसेच भारताच्या वाढत्या ‘इनोव्हेशन पॉवर’चे कौतुक केले.

Global Energy Crisis: जागतिक ऊर्जा संकटावर चिंता

पश्चिम आशियातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढती जागतिक अस्थिरता यामुळे जगाच्या ऊर्जा सुरक्षेवर (Energy Security) अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत. या ऊर्जा संकटामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा ताण निर्माण झाला असून विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधानांनी यावर जागतिक स्तरावरून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.


India Innovation Power: मोबाईल उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

भारताच्या तांत्रिक आणि औद्योगिक क्रांतीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणावर मोबाईल आयात (Import) करणारा भारत आता जागतिक स्तरावर निर्यातदार बनत आहे. भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) आणि नवोन्मेष क्षमता (Innovation) आज जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Startup Growth: भारतात २ लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि १२५ युनिकॉर्न

भारतातील स्टार्टअप परिसंस्थेचा आलेख मांडताना ते म्हणाले:

  • १२ वर्षांपूर्वी देशात ५०० पेक्षाही कमी स्टार्टअप्स होते; आज ही संख्या दोन लाखांहून अधिक झाली आहे.
  • २०१४ मध्ये भारतात केवळ ४ युनिकॉर्न कंपन्या होत्या, आज भारताने झेप घेत सुमारे १२५ युनिकॉर्न कंपन्यांचा टप्पा गाठला आहे.

Semiconductor Mission: चिप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताची ऐतिहासिक झेप

पंतप्रधान मोदींनी सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची माहिती दिली. सध्या देशात १२ सेमीकंडक्टर प्रकल्पांवर वेगाने काम सुरू असून, त्यापैकी २ मोठ्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष उत्पादनही सुरू झाले आहे. ‘डिझाइन इन इंडिया, मेड इन इंडिया’ या संकल्पनेच्या जोरावर भारत आगामी काळात जागतिक चिप उत्पादन क्षेत्रात (Global Chip Manufacturing) मुख्य केंद्र आणि महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Youth Aspirations: आकाशाला गवसणी घालणारा भारतीय युवा

“आज भारताचा युवा अत्यंत मोठी स्वप्नं पाहत आहे. त्याला केवळ छोटा-मोठा बदल नको आहे, तर त्याला सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान प्रगती हवी आहे,” अशा शब्दांत मोदी यांनी देशातील तरुणांच्या महत्त्वाकांक्षा आणि भारताच्या अमर्याद क्षमतेवर दृढ विश्वास व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 18-05-2026