कान्स (Cannes): आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Cannes Film Festival) यंदा मराठी मनोरंजन विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने कान्सच्या मुख्य रेड कार्पेटवर (Main Red Carpet) दिमाखदार पदार्पण (Debut) केले आहे. ग्लॅमर, फॅशन आणि जागतिक सिनेसृष्टीचा संगम असलेल्या या मंचावर प्राजक्ताने अस्सल मराठमोळा अंदाज दाखवत परदेशी फोटोग्राफर्सच्या नजरा स्वतःकडे खिळवून ठेवल्या.
प्राजक्ताने तिच्या या ऐतिहासिक कान्स डेब्यूचा एक खास व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, सध्या तिच्या लूकची आणि कॅप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे.
नऊवारी साडी अन् पारंपरिक साज; पदराने वेधले लक्ष!
कान्सच्या रेड कार्पेटवर पाश्चात्त्य फॅशनचा बोलबाला असताना, प्राजक्ता माळीने मात्र अस्सल पारंपरिक नऊवारी साडी नेसून हजेरी लावली. नऊवारी साडीसोबतच नाकात पारंपरिक मराठी नथ आणि दागिन्यांचा साज तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होता.
या व्हिडिओमध्ये प्राजक्ता अत्यंत आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसत आहे. विशेषतः तिने ज्या पद्धतीने तिच्या नऊवारीचा पदर फ्लॉन्ट केला, ते पाहून तेथील आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर्सही थक्क झाले. सोशल मीडियावर तिच्या या ‘अस्खलित मराठमोळ्या सौंदर्यावर’ चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘जगाला मराठी ठसका दाखवला…’ प्राजक्ताची भावूक पोस्ट
आपला व्हिडिओ शेअर करताना प्राजक्ताने अत्यंत अभिमानास्पद कॅप्शन लिहिले आहे. तिने म्हटले की:
“The world famous ‘Red Carpet of Cannes Film Festival… कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ- नऊवार नेसून चालण्याचा, जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे… आणि अशा प्रकारे मराठीने ‘Main Red Carpet of Cannes Film Festival’ मध्ये Debut केला… (या आधी जे मराठी कलाकार कान्सला गेले ते हिंदी-हिंग्लिश चित्रपट किंवा वेगळ्या रेड कार्पेटवर चालले. तिथे ४-५ वेगवेगळ्या थिएटर्समध्ये फिल्म्स चालू असतात.) आम्ही मराठी कलाकार – मराठी भाषेच्या प्रसारार्थ चाललो; ह्याचा अत्यानंद…”
‘अभिजात मराठी’चे जागतिक मंचावर ग्लोबल लाँचिंग
मराठी भाषेला मिळालेल्या ‘अभिजात दर्जा’च्या पार्श्वभूमीवर, यंदा कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘भारत पॅव्हेलियन’ (Bharat Pavilion) अंतर्गत एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या जागतिक मंचावर ‘अभिजात मराठी’चे ग्लोबल लाँचिंग करण्यासाठी प्राजक्ता माळी तिथे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिली आहे, जी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
मराठी दिग्गजांची कान्समध्ये मांदियाळी
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केवळ प्राजक्ताच नव्हे, तर मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar – कोकण क्युट गर्ल) यांनीही रेड कार्पेटवर आपला खास मराठमोळा अंदाज दाखवत पदार्पण केले आहे. या सर्व कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी संस्कृतीचा डंका वाजवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 18-05-2026














