मानवी आरोग्याला अत्यंत अपायकारक आणि थेट भावी पिढीच्या जनुकीय संरचनेत (Genetic Structure) फेरबदल घडवण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दापोलीतील एका दुकानदारावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या ‘श्री स्टोअर्स’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून ७ हजार ३२२ रुपये किमतीचा गुटखा, प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे.
याप्रकरणी समीर दामोदर महाडिक (वय ५२ वर्षे) या दुकानदाराविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई…
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास गिम्हवणे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या ‘श्री स्टोअर्स’ या दुकानात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासनाचे (म. राज्य) सहाय्यक आयुक्त संकेत शंकरराव कोणेरी (वय २७ वर्षे) यांनी आपल्या पथकासह या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात दुकानामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. हा सर्व साठा जप्त करून १८ मे रोजी रात्री १९:५४ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
७,३२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आणि FDA पथकाने खालील मुद्देमाल जप्त केला आहे: १) ५२२ रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला (किंग पॅक) २९ पाऊचेस.
२) २८८ रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला (बिग पॅक) ०६ पाऊचेस.
३) ३,७६२ रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला (किंग पॅक) १९ पॅक.
४) ३३० रुपये किमतीचे व्ही १ सुगंधित तंबाखू (किंग पॅक) १५ पॅक.
५) ९८० रुपये किमतीचे रजनीगंधा पान मसाला ४९ पाऊचेस.
६) ८४० रुपये किमतीचे आर.एम.डी (RMD) पान मसाला ५६ पाऊच.
७) ६०० रुपये किमतीचा एम सुगंधित तंबाखू ०१ पॅक.
एकूण जप्त माल: ७,३२२ रुपये.
“भावी पिढीच्या जनुकीय संरचनेत फेरबदल होऊ शकतात!” – वैज्ञानिक पुरावे
अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार, अशा प्रतिबंधित आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मानवी शरीरास अत्यंत घातक आहे. व्यापक वैज्ञानिक पुराव्यांवरून असे सिद्ध झाले आहे की, या पदार्थांच्या प्रतिकूल परिणामांमुळे भावी पिढीच्या जनुकीय संरचनेत (DNA/Genetic Structure) देखील गंभीर फेरबदल होऊ शकतात, जे समाजस्वास्थ्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत.
आरोपी समीर महाडिक याला या पदार्थांच्या सेवनाने मानवी शरीरास गंभीर दुखापत किंवा मृत्यू होऊ शकतो याची पुरेपूर कल्पना होती. तसेच, हा बेकायदेशीर साठा त्याने कुठून आणि कोणाकडून खरेदी केला, याबाबत विचारणा केली असता तो कोणताही वैध तपशील किंवा कागदपत्रे सादर करू शकला नाही. समोरच्या व्यक्तीच्या आरोग्याला जाणीवपूर्वक अपाय (विषबाधा किंवा गंभीर आजार) पोहचवण्याच्या उद्देशानेच त्याने हा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कलमांखाली गुन्हा दाखल
या गंभीर गुन्ह्यासाठी आरोपी समीर दामोदर महाडिक याच्याविरुद्ध खालील कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
- गुन्हा रजिस्टर क्रमांक: १०२/२०२६
- भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम: १२३, २२३, २७४, २७५ (अपराध करण्याच्या उद्देशाने विष किंवा अपायकारक द्रव्य देणे, मानवी जीवाला धोका निर्माण करणे).
- अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६: कलम ३(१) (ZZ) (V), २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv) व कलम २७(३), २७(३)(e), शिक्षा कलम ५९(३) सहवाचन कलम ३०(२)(a).
या कारवाईमुळे दापोली आणि परिसरातील बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.














