नाना… तुमचं जाणं मनाला चटका लावून गेलं; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची भावूक प्रतिक्रिया

चित्रपटसृष्टीसह सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान; ‘नाम फाउंडेशन’च्या कार्याचा केला गौरवपूर्ण उल्लेख

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “नाना… तुमचं जाणं मनाला चटका लावून गेलं.. माझ्यावर प्रेमाने रागावणारा, चिडणारा माणूस आज गेला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

माझ्यावर प्रेमाने रागावणारा हक्काचा माणूस गेला : उदय सामंत

आपल्या शोकसंदेशात भावना व्यक्त करताना उदय सामंत म्हणाले की, “नानांसोबतचे माझे संबंध केवळ परिचयापुरते किंवा सार्वजनिक जीवनापुरते मर्यादित नव्हते. आमच्यात एक जिव्हाळ्याचं, मनापासूनचं मैत्रीचं नातं होतं. अनेक प्रसंगी त्यांच्यासोबत झालेला संवाद, त्यांचा परखडपणा, माणसांकडे पाहण्याचा त्यांचा संवेदनशील दृष्टिकोन आणि एखादी गोष्ट मनापासून पटली की त्यासाठी ठामपणे उभं राहण्याची त्यांची वृत्ती माझ्या कायम स्मरणात राहील.”

Tata punch

अभिनयाने भूमिका अजरामर केल्या; माणूस म्हणूनही होते मोठे :

नाना पाटेकर यांच्या अभिनय प्रवासाचा गौरव करताना त्यांनी नमूद केले की, “नानांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील असंख्य भूमिका आपल्या ताकदीने अजरामर केल्या. पडद्यावरचा त्यांचा आवाज, संवादफेक, डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि भूमिकेत पूर्णपणे सामावून जाण्याची क्षमता पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. पण माझ्यासाठी पडद्यावरचा नाना जितका मोठा होता, त्यापेक्षा माणूस म्हणून भेटलेला नाना अधिक मोठा होता.”

कोकणच्या मातीशी आणि शेतकऱ्यांशी असलेले नाते सदैव स्मरणात राहील :

‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, दुष्काळग्रस्त भाग आणि जलसंधारणासाठी उभं केलेलं कार्य त्यांच्या सामाजिक जाणिवेची साक्ष देतं, असे सांगत सामंत म्हणाले, “कोकणच्या मातीशी नानांचं विशेष नातं होतं. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कोकणात झालेल्या जलसंधारणाच्या व सामाजिक कामांशी असलेला त्यांचा जिव्हाळा मी जवळून पाहिला आहे. २०२५ मध्ये नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यातही एकत्र येण्याचा प्रसंग आला होता. त्यावेळी त्यांची तळमळ पुन्हा प्रकर्षाने जाणवली होती.”

भावपूर्ण श्रद्धांजली; उणीव कायम जाणवेल :

“आज नाना आपल्यात नाहीत ही वस्तुस्थिती स्वीकारणं अत्यंत कठीण आहे. एक उत्तम अभिनेता, संवेदनशील माणूस, सामाजिक कार्यकर्ता आणि त्याहूनही अधिक म्हणजे माझा एक जिवलग मित्र आणि मार्गदर्शक आज आपल्यातून गेला. तुमच्या आठवणी, अभिनयाचा वारसा, स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची शिकवण सदैव प्रेरणा देत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली, नाना! तुमची उणीव कायम जाणवत राहील,” अशा शब्दांत उदय सामंत यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.