Nuclear Project: कोकणात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक! बारसू, पूर्णगड आणि देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प; १.२३ लाख रोजगार निर्माण होणार

मुंबई / रत्नागिरी: महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण आणि देशात अग्रेसर बनवण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील अणुऊर्जानिर्मितीला (Nuclear Energy) महागती देण्यासाठी सरकारने मंगळवारी देशातील चार बड्या उद्योग समूहांसोबत तब्बल साडेसहा लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले आहेत. या महागुंतवणुकीमुळे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू व पूर्णगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला मोठी गती मिळणार आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या हाय-प्रोफाइल बैठकीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

२५,४०० मेगावॅट ऊर्जानिर्मिती आणि बंपर रोजगार

या ऐतिहासिक करारांच्या माध्यमातून राज्यात २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पांमुळे राज्यात तब्बल १ लाख २३ हजार ५०० नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, ज्याचा मोठा फायदा कोकणातील स्थानिक सुशिक्षित तरुणांना मिळण्याची शक्यता आहे.

‘या’ चार दिग्गज कंपन्यांसोबत झाले करार:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खालील चार मोठ्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले: १. एनटीपीसीएल (National Thermal Powr Corporation Limited) २. अदानी पॉवर कंपनी ३. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries) ४. ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) – ही कंपनी एकटीच राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

याप्रसंगी पारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अदानी पॉवरचे विवेक शर्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे रंजय शरण आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘शून्य कार्बन उत्सर्जन’ उद्दिष्टासाठी महत्त्वाचे पाऊल

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्याचे आणि ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ (Zero Carbon Emission) साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्वच्छ आणि हरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी ही गुंतवणूक देशाला नवी दिशा देणारी ठरेल.”

हे प्रकल्प केवळ विजेचा प्रश्न सोडवणार नाहीत, तर राज्याच्या आर्थिक विकासाला गती देऊन लाखो हातांना काम देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच हे प्रकल्प युद्धपातळीवर सुरू व्हावेत यासाठी सरकार पूर्ण सहकार्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोकणातील प्रकल्पांना मिळणार गती

गेल्या काही काळापासून रत्नागिरीतील बारसू आणि पूर्णगड तसेच सिंधुदुर्गातील देवगड येथील ऊर्जा प्रकल्प विविध कारणांमुळे चर्चेत होते. मात्र, आता थेट देशातील सर्वोच्च कंपन्यांनी यामध्ये गुंतवणूक केल्याने आणि राज्य सरकारने अधिकृत करार केल्याने या भागाचा कायापालट होण्याचे संकेत मिळत आहेत.

गुंतवणुकीचा संक्षिप्त तपशील (Quick Highlights):

  • एकूण गुंतवणूक: ६.५ लाख कोटी रुपये.
  • एकूण ऊर्जानिर्मिती क्षमता: २५,४०० मेगावॅट.
  • एकूण रोजगार निर्मिती: १,२३,५०० रोजगार.
  • प्रकल्प क्षेत्र: बारसू, पूर्णगड (रत्नागिरी) आणि देवगड (सिंधुदुर्ग).
  • प्रमुख उद्दिष्ट: स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मिती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 20-05-2026