Khed Railway Suicide Attempt: धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून महिलेला ढकलून आत्महत्येचा प्रयत्न करणारा ‘तो’ निघाला खेड पोलिसांच्या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार

खेड:

खेड तालुक्यात शुक्रवारी (३ जुलै) सायंकाळी मेटे परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. या थरारक घटनेत अंजनी बौद्धवाडी येथील शुभ्रा अतिश दिवेकर (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर खेड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आणि दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी सचिन सत्यवान जुवळे व त्याच्यासोबत असलेले एक लहान मूल गंभीर जखमी झाले आहे. या दोघांवर सध्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, शुभ्रा दिवेकर, सचिन जुवळे आणि एक लहान मूल हे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. मेटे परिसरात या तिघांनीही धावत्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या. या घटनेत शुभ्रा दिवेकर या रेल्वे रुळाशेजारी कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन जुवळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. सोबत असलेल्या लहान मुलालाही दुखापत झाली आहे.

पोलीस पाटलांनी दिली घटनास्थळाची माहिती

कोतवलीचे पोलीस पाटील श्रीकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेस मेटे परिसरात थांबली. त्यावेळी रेल्वेतून एका महिलेसह पुरुष आणि मुलाने उड्या मारल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित महिला मृतावस्थेत आढळून आली, लहान मुलगा शुद्धीत होता, तर सचिन जुवळे बेशुद्ध अवस्थेत पडला होता. रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने जखमींना उपचारासाठी खेड येथे हलविले.

Shiva optical

घर पेटवून फरार झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, जखमी सचिन जुवळे हा खेड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गेल्या काही काळापासून तो दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना गुंगारा देत होता. १२ मे २०२६ रोजी त्याने स्वतःचे राहते घर पेटवून दिले होते, तेव्हापासून तो फरार होता. त्यानंतर १६ मे रोजी लोटे-आवाशी येथे त्याची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली होती, जी पोलिसांनी जप्त केली होती. जून महिन्यात तो चिपळूण परिसरात आल्याची खबर मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक पथकाने मोठी शोधमोहीम राबविली होती; मात्र तो पोलिसांना चकवा देऊन वालोपे परिसरातील डोंगर भागात पळून गेला होता.

नातेसंबंध आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

पोलीस पाटील श्रीकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शुभ्रा दिवेकर या सचिन जुवळे याच्या पत्नी नसून त्याच्या आतेभावाच्या पत्नी होत्या. संबंधित नातेवाईकाच्या निधनानंतर त्या सचिन जुवळे याच्यासोबत राहत होत्या. तसेच सचिन जुवळे याची पहिली पत्नी आणि मुले ही सध्या त्यांच्या आई-वडिलांकडे राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी जखमी सचिन जुवळे याच्या खिशात उंदीर मारण्याचे औषध आणि आत्महत्येचा उल्लेख असलेली एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

खेड पोलिसांकडून सखोल तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत शुभ्रा दिवेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ज्या मेटे परिसरात ही घटना घडली, त्या ठिकाणापासून सचिन जुवळे याचे मूळ गाव अवघ्या काही अंतरावर आहे. हे तिघे नेमके कोणत्या रेल्वे स्थानकावरून प्रवासासाठी चढले होते, याचा शोध अद्याप लागलेला नाही. या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून खेड पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 06-07-2026