लांजा:
मुंबई-गोवा महामार्गाशेजारी असलेल्या लांजा तालुक्यातील वाकेड लक्ष्मीबाग येथील एका पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे पेट्रोल पंपाच्या सुरक्षा केबिनवर डोंगराचा भलामोठा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ५५ ते ६० वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, या दुर्घटनेत अन्य तीन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री कोसळलेल्या या दरडीखाली एक अनोळखी व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. लांजा पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर लांजा तहसीलदार प्रियांका ढोल, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नायब तहसीलदार अनिल गोसावी, मंडळ अधिकारी प्रसन्न गुरव आणि ग्रामपंचायत अधिकारी वडवलकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रशासनाकडून रात्रीच युद्धपातळीवर शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य ओळखून वाकेड गावच्या पोलीस पाटलांच्या उपस्थितीत दरड हटवण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी ४ जेसीबी, १ पोकलेन आणि १ क्रेन अशा यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला. शनिवारी रात्री ८:३० वाजता सुरू झालेली ही शोधमोहीम रविवारी पहाटे ४:३० वाजेपर्यंत सलग आठ तास सुरू होती. अखेर पहाटे मातीचा ढिगारा पूर्णपणे बाजूला केल्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.
पावासापासून आडोसा शोधताना काळाचा घाला
लांजा तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार वादळी पाऊस कोसळत आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर आतापर्यंत चार वेळा दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सदर अनोळखी व्यक्ती या पेट्रोल पंपाच्या सुरक्षा केबिनजवळ उभी होती. त्याच वेळी केबिनच्या पाठीमागे असलेला डोंगराचा कडा अचानक कोसळला. कडा कोसळताना पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांनी प्रसंगावधान राखून तिथून पलायन केल्याने ते बालंबाल बचावले. मात्र, केबिनजवळ उभी असलेली व्यक्ती ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
तीन तरुण किरकोळ जखमी
डोंगराचा कडा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत पेट्रोल पंपाच्या केबिनचे मोठे नुकसान झाले असून परिसरात उपस्थित असलेले इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींची नावे जेद अतिकुल त्यागी (वय १८), सुवेल अयुब त्यागी (वय १९) आणि महंमद समीन साहवेज (वय २२) अशी असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. डोंगरकड्यांची खोदाई करून उभारलेल्या पेट्रोल पंपाशेजारील सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 06-07-2026














