चिपळूणात दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ समुद्री पक्षाची नोंद, वन विभागाकडून सुरक्षित रेस्क्यू

चिपळूण शहर:

चिपळूणात दुर्मीळ ‘मास्कड बुबी’ (Masked Booby) या समुद्री पक्षाची नोंद झाली असून, वन विभागाच्या तात्परतेमुळे या पक्षाला जीवदान मिळाले आहे. चिपळूण तालुक्यातील खरवते येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा अत्यंत दुर्मीळ पक्षी स्थानिक विद्यार्थ्यांना अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून आला. विद्यार्थ्यांनी तातडीने याबाबात वन विभागाला माहिती दिल्यानंतर, वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पक्षाचे सुरक्षित रेस्क्यू केले. सध्या या दुर्मीळ पक्षावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली आवश्यक ते उपचार सुरू आहेत.

कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील मैदानावर हा अनोखा पक्षी आढळल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी तात्परता दाखवून वनरक्षक रेश्मा कावळे यांना याविषयीची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पक्षाची ओळख पटवली. यानंतर विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देता या पक्षाचे सुरक्षित रेस्क्यू केले.

काय आहेत ‘मास्कड बुबी’ पक्षाची वैशिष्ट्ये?

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मास्कड बुबी’ हा ‘सुलिडी’ कुळातील मोठ्या आकाराचा समुद्री पक्षी आहे. पांढरे शुभ्र शरीर, काळे पंख आणि मुख्य म्हणजे डोळ्यांच्या भोवती असलेला काळा मुखवट्यासारखा (मास्कसारखा) पट्टा ही या पक्षाची प्रमुख आणि वेगळी वैशिष्ट्ये मानली जातात. समुद्रात उंचावरून थेट पाण्यात झेप घेत मासे पकडण्यात हा पक्षी अत्यंत कुशल आणि माहीर मानला जातो. सहसा अथांग समुद्रात वावरणारा हा पक्षी जमिनीवर किंवा मानवी वस्तीजवळ खूपच दुर्मिळतेने आढळतो.

निसर्गप्रेमी आणि पक्षीअभ्यासकांमध्ये उत्सुकता

चिपळूणसारख्या किनारपट्टीच्या आणि निम-शहरी भागात या दुर्मीळ आंतरराष्ट्रीय समुद्री पक्षाची नोंद झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पक्षीप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या हा पक्षी अशक्त असल्याने त्याला उडता येत नाहीये, त्यामुळे त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रथमोपचार आणि योग्य आहार दिला जात आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि पक्षी पूर्णपणे सक्षम व निरोगी झाल्यावर त्याला पुन्हा त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात (समुद्रात) मुक्तपणे सोडून देण्यात येईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 06-07-2026