मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेनंतर फडणवीसांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त फोर्स वनचे १२ जवान तैनात करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. फडणवीसांविरोधात कट रचला जात असल्याची सूचना गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागाने राज्य तपास यंत्रणांना हा अलर्ट दिला. त्यामुळे राज्य पोलीस दल सतर्क झालं आहे. फडणवीसांच्या जीवाचा धोका असल्याचं कळताच त्यांची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यात गुप्तचर विभागाकडून आलेल्या सूचनेनंतर फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई, नागपूर निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यक्रमांना ही सुरक्षा दिली जाईल.
राज्यात दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पाहता मुंबई पोलिसांनी हायप्रोफाईल लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत फोर्स वनचे १२ जवान तैनात करण्यात आले आहेत. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणेकडून मिळालेल्या अलर्टनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
संजय राऊतांची फडणवीसांवर खोचक टीका
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं कळालं, हे धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:चाच वाढवावी लागली. फोर्स वनचे जवान त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. हा काय प्रकार आहे..? राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का…भविष्यात मुख्यमंत्रिपदासाठी जो संघर्ष आहे तो पुढच्या १५ दिवसांत वाढणार आहे. फोर्स वन दहशतवाद्यांसाठी लढण्यासाठी स्थापन केला होता. त्या फोर्स वनचे जवान सुरक्षेत तैनात आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासने दिली ते हल्ला करणार आहेत, युक्रेन हल्ला करणार, रशिया करणार नेमकं काय झालंय असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावर केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 02-11-2024