पहिल्याच फेरीतच अकरावी प्रवेश चार तास ठप्प!

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच फेरीत गुरुवारी सकाळी साडेअकरानंतर संकेतस्थळ यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

विद्यार्थी-पालकांना मनस्ताप देणाऱ्या संबंधित कंपनीसोबतचा करारच रद्द करा, अशी मागणी आता पालकांनी केली आहे.

२१ मे रोजी विद्यार्थ्यांनी सकाळपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली. सकाळी साडेअकरानंतर संकेतस्थळावर सातत्याने अडथळा येऊ लागला. त्यामुळे एका अर्जासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे पालक ज्योती पाटील यांनी सांगितले. अर्ज भरताना पासवर्ड टाकल्यावर नंतर अचानक मुख्य पान आपोआप येत होते. त्यामुळे पालक विद्यार्थी पुरते गोंधळले. दरम्यान, प्रत्यक्ष शिक्षण विभागाच्या कार्यालयातही अर्जासाठी अडीच तास लागत असल्याचे मुंबई विभागातील कनिष्ठ अधिकारी प्राजक्ता राऊत यांनी सांगितले.

शासनाने अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करणार. अशा कंपनीचे कंत्राटच रद्द करा. ग्रामीण भागासाठी ऑनलाईन प्रक्रिया नको.
– मुकुंदराव आंधळकर, सरचिटणीस, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना

तांत्रिक अडथळ्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. अडचणी सोडवण्याचे पुरेपूर प्रयत्न शिक्षण विभागाकडून केले गेले. काही वेळानंतर संकेतस्थळ व्यवस्थितपणे कार्यरत केले गेले. त्यानंतर सायंकाळपर्यंत ९० हजार अर्ज देखील भरले गेले आहेत.
डॉ. महेश पालकर,
संचालक, माध्यमिक शिक्षण विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 22-05-2026