रत्नागिरीत आज विजांच्या कडकडाटासह ५० किमी वेगाने वादळी पावसाचा इशारा; सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि दमट हवामानामुळे हैराण झालेल्या रत्नागिरीकरांसाठी एक मोठी हवामान अपडेट समोर आली आहे. मुंबईच्या हवामान खात्याने (IMD Mumbai) दिलेल्या अधिकृत इशाऱ्यांनुसार, आज शुक्रवार २२ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

हवामान खात्याने केवळ आजच नव्हे, तर आगामी २३ आणि २४ मे रोजीही जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा (Rain Alert) कायम ठेवला असून नागरिकांनी प्रवास करताना किंवा बाहेर पडताना योग्य ती खबरदारी आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

घामाने जीव मेटाकुटीला; रत्नागिरीकर पावसाच्या प्रतीक्षेत

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोकणात प्रचंड दमट (Humid) हवामान आणि सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक पुरते वैतागले आहेत. काही वेळेला आकाशामध्ये ढगाळ वातावरण तयार होत असले, तरी पडणाऱ्या उष्णतेमुळे आणि घामाच्या धारांमुळे रत्नागिरीकरांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. मागील आठवड्यात सलग दो दिवस झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून काही काळ विश्रांती मिळाली होती; मात्र त्यानंतर पुन्हा दमटपणा आणि उष्मा वाढल्याने नागरिक आता मान्सूनपूर्व पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कोकणसह ‘या’ जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा पावसाचा प्रभाव केवळ रत्नागिरीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येही वादळी वारा थैमान घालण्याची शक्यता आहे. रत्नागिरीसह शेजारील रायगड, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये, तसेच पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:33 22-05-2026