खेड: राज्यभरात सध्या सुरू असलेल्या इंधन तुटवड्याचा (Fuel Shortage) मोठा फटका आता थेट कोकण किनारपट्टीलाही बसू लागला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने खेड (Khed) परिसरातील सीएनजी (CNG) पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे स्थानिक रिक्षाचालक, स्कूल बस चालक तसेच भाडेकरू वाहन चालकांना तीव्र मनस्ताप आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने चालक संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत.
सीएनजीसाठी ३ ते ४ तास प्रतीक्षा; चालकांच्या रोजीरोटीवर गदा!
सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून, सीएनजी भरण्यासाठी स्थानिक चालकांना तब्बल तीन ते चार तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे चालकांचा मौल्यवान वेळ वाया जात असून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर (Income) याचा अत्यंत गंभीर परिणाम होत आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येमुळे स्थानिक चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी संतप्त भावना विविध चालक संघटनांनी व्यक्त केली आहे.
तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पोलिसांना निवेदन
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खेडमधील विविध वाहन चालक संघटनांनी एकत्र येत थेट प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. संघटनांच्या वतीने खेड तहसीलदार, प्रांताधिकारी आणि खेड पोलीस ठाण्यात अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की:
पंपांवर होणारी गर्दी आणि रांगा टाळण्यासाठी प्रशासनाने पंपांवरील नियोजनात तात्काळ सुधारणा करावी.
शहरातील सीएनजी पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा.
इंधन भरताना स्थानिक व्यावसायिक वाहन चालकांना प्रथम प्राधान्य (Priority) देण्यात यावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:33 22-05-2026













