मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ व निर्वात वेष्टणीकरण प्रशिक्षण संपन्न; बचत गटातील महिलांना उद्योग संधी

रत्नागिरी :
मूल्यवर्धित मत्स्य पदार्थांचे निर्वात वेष्टणीकरण करून आर्थिक फायदा मिळवणे शक्य आहे; मत्स्य विद्याशाखेने सागरी मासळी पासून दीर्घकाळ टिकणारे विविध मत्स्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान तयार केलेले असून त्याचा फायदा किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार आणि महिला बचत गटांनी करून घेतल्यास स्वयंरोजगाराचे एक उत्कृष्ट साधन निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन मत्स्यकी अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांनी केले आहे . शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, जलजीविका रत्नागिरी आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती आणि निर्वात वेष्टणीकरण ” तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरू डॉ संजय भावे, संशोधन संचालक डॉ प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ ठोकळ, कृषी तंत्रज्ञान शिक्षण सहयोगी अधिष्ठाता डॉ वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला .

या प्रशिक्षण कार्यक्रमात शिरगाव, मिऱ्या व कासारवेली पंचक्रोशीतील क्रांती बचत गटाच्या सदस्य महिला सहभागी झाल्या . प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये महिलांना फिश क्रेकर्स व प्रॉन्स क्रेकर्स निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले .प्रात्यक्षिक पश्चात सहभागी महिलांनी स्वतः प्रत्यक्ष मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करून घेतले . तयार केलेले मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ सोलर ड्रायर च्या साह्याने सुकवण्यात आले . सुके मासे आणि मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ यांचे निर्वात वेष्टणी करण म्हणजेच व्हॅक्युम पॅकेजिंग कसे करावे, याविषयी सहाय्यक प्राध्यापक तौसिफ काझी यांनी मार्गदर्शन केले .

फिश क्रेकर्स आणि प्रॉन्स क्रेकर्स प्रात्यक्षिक जलजीविकाच्या प्रकल्प समन्वयक सृष्टी सुर्वे व समृद्धी सनगरे आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक अपूर्वा सावंत आणि वर्षा सदावर्ते यांनी करून दाखवले . मासळी सुकवण्याकरता सोलर ड्रायरचा वापर कसा करावा याविषयी माहिती व प्रात्यक्षिक जलजीविका चे प्रकल्प प्रमुख श्री चिन्मय दामले आणि सहाय्यक प्राध्यापक तौसीफ काझी यांनी केले .

मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ आणि निर्वात वेस्टर्नीकरण तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी क्रांती महिला बचत गटाच्या प्रमुख सोनाली शिवलकर यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यात बचत गटाच्या महिला मूल्यवर्धित पदार्थ तसेच निर्वात वेष्टणीकरण करून स्वयंरोजगार करतील अशी आशा व्यक्त केली . इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन च्या अध्यक्ष श्रीमती ऋचा गांधी यांनी बचत गटातील महिलांना संस्थेकडून सदैव मदत केली जाईल, असे आश्वासन दिले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, तसेच सहाय्यक संशोधन अधिकारी श्री सचिन साटम, श्री नरेंद्र चौगुले, डॉ मनोज घुगुसकर, अभिरक्षक डॉ . हरीश धमगाये, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे डॉ. सुशील कांबळे, निलेश मिराजकर, मयुरी डोंगरे यांनी मेहनत घेतली .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 23-05-2026