Chiplun: चिपळुणातील बँक कर्मचारी बेपत्ता

चिपळूण : चिपळूण शहरातील काविळतळी परिसरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला ३३ वर्षीय युवक शुक्रवारी दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची नोंद शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मुकुंद मुरलीधर पालांडे असे बेपत्ता युवकाचं नाव असून तो अलोरे गावचा रहिवासी आहे.

मुकुंद पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी चिपळूण पोलीस निरीक्षकांना उद्देशून स्वहस्ताक्षरात चार पानी पत्र लिहून ठेवले आहे. या पत्रामध्ये चार जणांची नावे नमूद करत त्यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार धरले असल्याचे समोर आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी चिपळूणमधील विरेश्वर तलाव परिसरात काही तरुणांनी आपल्याला मारहाण केल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. त्या वेळी ओळखीच्या पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मानसिक त्रास व ब्लॅकमेलिंगमुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही मुकुंद यांनी पत्रात लिहिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कोळकेवाडी धरण परिसरात शोधमोहीम राबविली. कोळकेवाडी कॅनॉल नजीक मुकुंद याची दुचाकी आढळून आल्याने त्या भागात पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर शनिवारी सकाळपासून चिपळूणहून बोट मागवून कॅनॉल परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 23-05-2026